स्वपक्षासह आघाडीतील नाराजांसह विरोधी पक्षातील राजकीय विरोधकांशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करून आपली बाजू अधिक भक्कम करण्याची कामगिरी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी करून, आपल्या संघटन कौशल्याचा उत्तम नमुना पेश केला आहे. याउलट शिवसेनेचे विद्यमान ज्येष्ठ खासदार अनंत गीते यांनी आमदार रामदास कदम यांच्या समर्थकांची पदावरून उचलबांगडी करून, गटबाजीच्या राजकारणाला प्रोत्साहन देऊन शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली आहे. तसेच गीते यांच्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या शेतकरी कामगार पक्षालाही दुखावल्याने या पक्षानेही रमेश कदम यांच्या रूपाने स्वतंत्र उमेदवार उभा करून गीते यांच्याबद्दलची नाराजी दाखवून दिली आहे.
एकूणच तटकरे यांनी माणसे जोडण्याचे, तर गीते यांनी मात्र आपलीच माणसे तोडण्याचे काम केले आहे. या राजकीय पाश्र्वभूमीवर रायगडचा हा ‘राजकीय गड’ कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे.
पूर्वाश्रमीचा रत्नागिरी व सन २००९ पासूनचा रायगड लोकसभा मतदारसंघ, रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागरपासून रायगड जिल्ह्य़ातील पेणपर्यंत लांबलचक पसरलेला, सह्य़ाद्रीच्या पायथ्यापासून अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेला हा मतदारसंघ असून तो पूर्णपणे पिंजून काढणे हे एक मोठे आव्हानच आहे. यासाठी प्रभावी प्रचारयंत्रणा आणि कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज उमेदवाराच्या पाठीशी असणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबतीत तटकरे निश्चितच नशीबवान आहेत. तर गीते यांच्या मार्गात रामदास व रमेश हे दोन कदम आडवे आल्याने त्यांचा मार्ग खडतर बनला असल्याचे आजचे चित्र आहे.
या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर व दापोली आणि रायगडातील महाड, श्रीवर्धन, अलीबाग व पेण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १५ लाख १३ हजार ६०८ मतदारांमध्ये सात लाख ४३ हजार ६५ पुरुष, तर सात लाख ७० हजार ५४३ स्त्री मतदार आहेत. विशेष म्हणजे सुमारे ५१ टक्के महिला मतदार असलेल्या या मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेली नाही. सन २००९ च्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत पावणे दोन लाखांची भर पडली असून, यामध्ये १८ ते २५ वयोगटातील ५५ ते ६० टक्के नवमतदारांचा समावेश आहे. आतापर्यंत ठिकठिकाणी झालेले वाढीव मतदान पाहता या मतदारसंघातही मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत गीते यांच्या विजयात शेकापचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी ते १ लाख ४६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. अलीबाग, पेण, महाड व श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघांतून त्यांना ८४ हजारांचे तर दापोली व गुहागरातून ६१ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. रायगडात शेकापची दोन लाख मते आहेत. मात्र यावेळी शेकापने आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविल्याने गीते यांना याचा मोठा फटका बसणार आहे. याशिवाय मनसेच्या पाठिंब्यामुळे शेकापच्या मतांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे गीते यांना महाड व दापोली, गुहागरातून मिळणाऱ्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र शिवसेनेचे धडाडीचे नेते आ. रामदास कदम यांनी घेतलेली गीते यांच्या विरोधातील टोकाची भूमिका पाहता गुहागर व दापोलीतून किती मताधिक्य मिळेल याबाबत दस्तुरखुद्द शिवसेनेतच संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते.
रमेश कदम यांना रायगड जिल्ह्य़ातील सर्व दोन लाख मते मिळतील, असे गृहीत धरले तरी त्यांनाही दापोली व गुहागरातील राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवावी लागणार आहेत. तर तटकरे यांना काँग्रेस आघाडीची रायगडातील तीन लाख मते मिळतील असा अंदाज असून, त्यांना विजयासाठी गीते व कदम यांच्याप्रमाणेच दापोली व गुहागरातील जास्तीत जास्त मते मिळवावी लागणार आहेत. मात्र त्यांचे राजकीय शस्त्र आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव कितपत सहकार्य करतात, यावर तटकरेंचे भवितव्य अवलंबून आहे.
त्यामुळे येत्या गुरुवारी (२४ एप्रिल) रोजी या मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे, शिवसेना महायुतीचे अनंत गीते, शेकापचे रमेश कदम या दिग्गजांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असून, रायगडचा राजकीय गड कोण जिंकणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader