Ladki Bahin Scheme credit war in Mahayuti: लाडकी बहीण योजना सध्या गाजतेय, कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून योजनेसाठी अर्ज करण्याला आता सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या एका जाहिरातीमुळे सध्या वाद उद्भवला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव त्यांनी माझी लाडकी बहीण योजना असे दाखविल्यामुळे या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न एका पक्षाकडून होत असल्याची टीका शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली. तसेच भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘देवा भाऊ’ असे फलक बारामतीमध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपाकडूनही या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न खुद्द फडणवीस यांनाच टीव्ही ९ वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादाच्या लढाईवर प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर काय परिणाम झाला, ते महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावर सविस्तर भाष्य केले.
देवा भाऊ नावावर स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला सुरुवातीपासून देवा भाऊ किंवा देवेंद्र भाऊ अशी हाक मारली जाते. देवा भाऊ हे नाव लोकांना जास्त जवळचे वाटते. पण लाडकी बहीण योजनेवरून आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. ही योजना तीनही पक्षांच्या महायुती सरकारने आणली. कुठलीही योजना आणली तरी त्याचे श्रेय मुख्यमंत्र्याचे असते. या योजनेचे खरे श्रेय कुणाचे असेल तर ते आमच्या बहिणींचे आहे. श्रेयवादावरून मंत्रिमंडळात यावरून कुठलाही राडा वैगरे झालेला नाही. या योजनेचे ब्रँडिंग कसे करायचे? यावरून निश्चित चर्चा झाली. त्यावेळी तीनही पक्षांनी समान पद्धतीची जाहिरात करावी, यावर आम्ही चर्चा केली.
लाडकी बहीण नेमकी कुणाची?
ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावानेच आहे. महायुतीमधील तीनही घटक पक्ष बहिणींचे भाऊ आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र यातील मोठा भाऊ कोण? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मोठा भाऊ कोण, लहान कोण? याच्याशी बहिणींना घेणेदेणे नाही. ओवाळणी स्वरुपात काहीतरी सरकारने दिले, याचे त्यांना समाधान आहे.
आणखी वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
अजित पवार आमच्याबरोबर येऊन बदलले
अजित पवारांना महायुतीत घेऊन चूक झाली का? असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आमची चूक वैगरे झालेली नाही. ही युती होणे काळाची गरज होती. त्यांना सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. पण पुढे जाऊन आम्हाला त्यांची मदतच होईल. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणाले की, आम्ही महायुतीत आलो असलो तरी आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडली नाही. यावरून युतीत दादा गुलाबी झाले, पण भगवे झाले नाहीत, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, “अजित पवार काही दिवसांपूर्वी सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले. अजित पवारांना आमचा गुण लागला. पुढेही अजित पवार आणखी बदलल्याचे दिसतील.”