Sharad Pawar On Original NCP : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या ४१ जागा जिंकून आल्या. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच अन् अजित पवार याचे अध्यक्ष असा दावा आता सुरू झाला आहे. दरम्यान, शरद पवारांनी यांनी कालच्या निकालावर विवेचन करण्याकरता आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी खरी राष्ट्रवादी कोण अन् त्याचा अध्यक्ष कोण यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,  अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे.

हेही वाचा >> Sharad Pawar : विधानसभेत ‘मविआ’ला अपयश का आलं? शरद पवारांनी सांगितली तीन मोठी कारणं; म्हणाले, “बटेंगे तो कटेंगे…”

लोकांनी दिलेल्या निर्णयावर अभ्यास होणार

“आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल लागलेला नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी अभ्यास करणार आहे. तसेच या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

लाडकी बहीण योजनेचा परिणाम

सत्ताधाऱ्यांकडून निवृत्त होण्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “मी काय करावं? ते मी आणि माझे सहकारी ठरवतील. त्यामुळे तो महत्वाचा प्रश्न नाही. आता निकालानंतर जी माहिती आम्ही लोकांकडून आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून घेतो आहोत त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करण्यात आला की आम्ही सत्तेत आलो नाही तर ही योजना बंद होईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही वर्गाने आमच्या विरोधात जाऊन मतदान केलं”, असं शरद पवारांनी म्हटलं.

ईव्हीएमवरील बाबत शंका आहे का?

“लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची राज्यातील जनतेची भावना होती. त्यामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात विश्वास होता. त्या विश्वासामुळे आम्ही ज्या प्रकारे प्रचार केला. मात्र, त्याही पेक्षा जास्त प्रचार करण्याची गरज होती असं आता वाटतं. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whose ncp after the maharashtra vidhan sabha result sharad pawar said more seats for ajit pawar sgk