राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील अशाच प्रकारचा दावा केला जात आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी ११ जणांमध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. तो संबंधित उमेदवार नेमका कोण असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
असं असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? असं विचारलं असता पाटील म्हणाले की, “राजकारणामध्ये जिंकेपर्यंत प्रत्येकानं जिंकण्याचा दावा करायचा असतो. घोडेमैदान लांब नाहीये. २० तारखेला सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल, साडेसातपर्यंत कल स्पष्ट होईल. यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडेल, भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार विजयी होतील” असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
आता ही विकेट नेमकी कोणाची असेल, हे त्यांच्यातील आपसातील बेबनाव ठरवेल, असंही पाटील यावेळी म्हणाले. पाटलांच्या या विधानानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “महाविकास आघाडी सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. जो २६चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल,” असं विधान त्यांनी केलं आहे.
हेही वाचा- “लूट लूट लुटायचं हाच मविआचा किमान समान कार्यक्रम”; प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल
सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही अपक्ष आमदारांशी बोलणी करत आहोत. अपक्ष आमदारांची सर्वच पक्षांना गरज आहे. तेही प्रत्येकी पाच लाख नागरिकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना मान सन्मान ठेवून मतं मागितली पाहिजेत. आरोप-प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.