विधिमंडळ परिसरात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचेही आमदार गेले असताना फक्त मनसेच्या आमदारावरच कारवाई का?, असा घणाघाती सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारला केला. अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर झालेल्या विशाल जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केले.
नुकत्याच घडलेल्या मारहाण प्रकरणावर राज ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. या मुद्दय़ावरून फक्त मनसेच्या आमदाराला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करून राज ठाकरे म्हणाले, पोलिसाला मारहाणीचा प्रकार चुकीचाच होता. त्याला क्षमा नाही. आज पोलिसांवर हात उगारणारे उद्या न्यायाधीशांवरही हात उगारायला कमी करणार नाहीत. या राज्यात काही शासन आहे की नाही? परंतु, पाच आमदारांचे निलंबन करून त्यापैकी फक्त दोघांवरच पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कुठला न्याय? बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर आणि मनसेचे राम कदम यांच्यावर गुन्हे नोंदविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वत:च्या आमदारांवर मात्र कारवाई करणे टाळले आहे. अर्थसंकल्पाला विरोध करण्याची धमकी दिल्याने ही कारवाई टाळण्यात आले. निलंबन जर पाच आमदारांचे होते तर पाचही आमदारांवर पोलीस कारवाईदेखील झालीच पाहिजे. दोघांविरुद्ध गुन्हे आणि बाकीच्यांना सोडून द्यायचे आणि हे राजकारण भोळ्याभाबडय़ा जनतेने पाहत राहायचे, असे यापुढे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
याच मुद्दय़ावरून दोन संपादकांविरुद्ध आणलेल्या हक्कभंगाचाही राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. तुमच्या आमदारांचे हक्क महत्त्वाचे आणि बाकीच्यांच्या हक्कांचे काय, असा सवाल करून तुम्हाला राज्य म्हणजे बापाचा माल वाटला काय?, असा सवाल त्यांनी केला. राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पाच खाती राष्ट्रवादीकडे आहेत. राज्यात सारे काही आलबेल असल्याचे गृहमंत्री आबा पाटील सांगताहेत मग अनेक जिल्ह्य़ातून पळविलेल्या मुली गेल्या कुठे, या प्रश्नाचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.
राज्यातील सिंचन प्रकल्पांचे ७० हजार कोटी रुपये कुठे गेले, अशी घणाघाती विचारणा राज ठाकरे यांनी आज अर्थमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा केली. गेली १४ वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विदर्भ, मराठवाडय़ाचा मागास अनुशेष का वाढला आणि आता त्याची चिंता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना लागली आहे, अशी खोचक टीका करताना विदर्भातील सिंचनाची आकडेवारीच त्यांनी सादर केली. सिंचनातील भ्रष्टाचारावर पांघरूण घातले जात असून वर्षांकाठी प्रकल्पांच्या किमती वाढत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात अजित पवारांनी असंख्य सिंचन प्रकल्प मंजूर करून २५ हजार ८५६ कोटी रुपयांची अग्रीम राशी उचलण्यात आली आणि त्याचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी करण्यात आला, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प, बेरोजगारी, परप्रांतीयांची घुसखोरी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, मुली बेपत्ता होण्याच्या घटनांबरोबरच त्यांनी ताडोबातील वाघांच्या शिकारीवरही तीव्र चिंता व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा