राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठकीतील चर्चेबद्दलची माहिती दिली. मात्र या पत्रकार परिषदेला राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. आधी आदित्य ठाकरेंना या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र आदित्य ठाकरे या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला गृहमंत्र्यांसोबत उपस्थित राहण्यामागे एक विशेष कारण होतं. याबद्दल बोलताना दिलीप वळसे पाटलांनीच कल्पना देत आदित्य यांना भूमिका मांडण्यास सांगितलं.

नक्की वाचा >> मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात बोलताना गृहमंत्री गावांतील भजनं, किर्तनांसहीत नवरात्री, गणेशोत्सवाचाही उल्लेख करत म्हणाले, “सर्वांना…”

शासन आदेशानुसार भोंग्यांचा वापर कायम राहणार
सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल असं सांगतानाच राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नसल्याचं म्हटलंय. सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात हे कायम राहणार आहे असंही गृहमंत्री म्हणाले.

भाजपाचे नेते हजर राहू शकले नाहीत
“काही राजकीय पक्षांनी डेड लाइन ठरवून दिलीय. या संदर्भात मी आज एक बैठक बोलवलेली होती सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बऱ्याच पक्षाचे लोक उपस्थित राहिले. पण काही पक्षांचे नेते विशेषत: भाजपाचे नेते हजर राहू शकले नाहीत. बैठकीत अतिशय योग्य दिशेने चर्चा झाली. राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी अशाप्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलेलो आहोत,” असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

सरकारने जीआर काढलेत
तसेच पुढे बोलताना, “प्रश्न असा आहे की भोंग्यांचा वापर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये निर्णय दिला. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने १ जुलै २०१५, ६ जुलै २०१५, १४ जुलै २०१५, २८ जुलै २०१५ तसेच २८ फेब्रुवारी २०१७, ३ मार्च २०१७, ७ जुलै २०१७ रोजी म्हणजेच २०१५ ते २०१७ दरम्यान काही जीआर (शासन आदेश) काढलेले आहेत. त्याआधारे भोंग्यांचा वापर, त्याला द्यायची परवानगी, त्यासाठीच्या अटी आणि शर्थी, त्यासाठीची वेळ, आवाजाची मर्यादा हे सारं स्पष्ट केलेलं आहे. त्या आधारेच आजपर्यंत भोंग्यांचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये भोंग्यांच्या वापराच्या संदर्भात अमुक तारखेपर्यंत भोंगे उतरवू, आम्ही हनुमान चालिसा म्हणून वगैरे वगैरे.. अशाप्रकारे भोंगे लावणे किंवा उतरवणे यासंदर्भातील कोणतीही तरतूद नाही. सरकार त्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकत नाही,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

धार्मिक उत्सवांवर काय परिणाम होणार?
“ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्वाचं आहे. आजच्या चर्चेत जे मुद्दे निर्माण झाले अजानच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. बैठकीत हा ही प्रश्न निर्माण झाला की ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट समाजाच्यासंदर्भात अशाप्रकारची भूमिका घेऊ त्यावेळेला त्याचा परिणाम अन्य समाजावर किंवा अन्य समाजावर अथवा धार्मिक उत्सवांवर काय होणार?,” असा प्रश्न चर्चेत आल्याचं वळसे-पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरेंना बोलण्यास सांगितलं
यानंतर गृहमंत्र्यांनी आतापर्यंत ज्या शासन आदेशानुसार भोंग्यांसंदर्भातील निर्णय घेण्यात आलेत ते ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावर पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत घेण्यात आले असून गृहमंत्रालय त्याच्या अंमलबजावणीचं काम करत आहे, अशी माहिती दिली. तसेच त्यानंतर त्यांनी पर्यावरण मंत्री या नात्याने आदित्य ठाकरे भूमिका स्पष्ट करतील असं सांगत आदित्य यांना पत्रकारांसोबत बोलण्यास सांगितलं.

आदित्य काय म्हणाले?
“गृहमंत्र्यांनी सांगितलं तसं हा फार महत्वाचा विषय आहे. ध्वनी प्रदुषण आणि कायदा व सुव्यवस्था यांचा समतोल साधण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यात सर्वच पक्ष सहभागी झाले होते. भाजपा बैठकीला येऊ शकली नाही. तरी देखील सर्वांची योग्य ती मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, यात काही वेगळं करता येत का, यावर एक मोठा विचार सुरु आहे,” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

देशाचा आढावा घेऊन योग्य ती पावलं
“तरी देखील मंत्रीमोहोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे सारं असल्याने केंद्र सरकारकडे देखील आम्ही थोडी चर्चा करु. यात वेगळं काही आहे का?, इतर राज्यांमध्ये काय सुरु आहे? देशाचा आढावा घेऊन योग्य ती पावलं पुढे कशी टाकायची याच्यावर विचार सुरु आहे,” असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच या बैठकीमध्ये पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत काढलेल्या शासन आदेशांमध्ये अधिक काय बदल करावेत का?, केले तर ते कसे असावेत याबद्दल चर्चा झाल्याने बैठकीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती महत्वाची होती.

गृहमंत्र्यांनी केला इतर सणांचा उल्लेख
पुढे बोलताना, “खेडेगावामध्ये रोज किंवा काही अंतरावर त्याठिकाणी भजन सुरु असतं. किर्तन सुरु असतं, पहाटेची काकड आरती असते. नवरात्रीचा उत्सव असतो, गणपतीचा उत्सव असतो. गावाकडे यात्रा असतात. या सगळ्या गोष्टींवर त्याचा काय परिणाम होईल यासंदर्भातही चर्चा केली. आपण जर मानलं की कायदा हा सर्वांसाठी समान आहे तर वेगवेगळ्या समाजातील लोकांसाठी वेगवेगळी भूमिका या ठिकाणी घेता येणार नाही. सर्वांसाठी आपल्याला एकच भूमिका घ्यावी लागेल,” असंही गृहमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने देशव्यापी आदेश काढावेत
“हे ही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्याचा भंग झाला तर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करणं अपेक्षित आहे. त्यापद्धतीने पोलीस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बोलत असताना, हे करत असताना या भोंग्यांच्याबद्दल एक असंही मत आलं की हा निर्णय जो आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने हा संपूर्ण देशाला लागू आहे. देशाला लागू असल्याने केंद्राने राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेऊन लागू केला तर राज्याराज्यामध्ये ही वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही. आवश्यक असल्यास सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रातील प्रमुख नेत्यांना भेटावं आणि देशपातळीवर भूमिका स्पष्ट करावी अशी ही भूमिका आहे,” असं गृहमंत्री म्हणाले.

मनसेबद्दल गृहमंत्री म्हणाले…
३ मे ची डेडलाइन मनसेनं दिली आहे, असा प्रश्न विचारत काही नव्या गाइडलाइन्स काढल्या जाणार आहेत का? असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “बैठकीमध्ये ज्या जीआरवर चर्चा झाली त्याच जीआरच्या आधारे आपण निर्णय घेत आहोत. मी यासंदर्भात पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून ठरवणार आहे की आहेत त्या गाइड लाइन्स योग्य आहेत की नव्याने गाईड लाइन्स काढण्याची आवश्यकता आहे का?” यावर चर्चा करुन निर्णय घेऊन असं सांगितलं.

भोंग्यांना या वेळात आहे परवानगी
बाहेर काही पक्षांचे नेते भोंग्याबद्दलच्या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं सांगत असल्याचं गृहमंत्र्यांना सांगितलं असता. “अशी भूमिका कोणीही बैठकीत मांडलेली परवानगी सकाळी सहा पाहून रात्री १० पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे,” असं गृहमंत्री म्हणाले.