एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये जे बंड केलं त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यात आलं. त्यानंतर एक वर्षाने म्हणजेच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार आणि त्यांच्यासह अनेक आमदार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गट सत्तेत का आला? याचं उत्तर दिलं आहे. तसंच अजित पवार गटाला भाजपाने आणि शिंदे गटाने का बरोबर घेतलं? याचंही उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“सरकार निश्चितपणे स्थिर होतंच. पण राजकारणात शक्ती वाढवावीच लागते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी कुणी बरोबर येत असेल तर त्यांना का घेऊ नये? मी यापूर्वीही सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याकडे २०१९ ला ही येणारच होती. स्थिर सरकार आणि काम करणारं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होऊ शकत नाही ते भाजपाबरोबरच होऊ शकतं ही मानसिकता राष्ट्रवादीची होतीच. त्यामुळे त्यांना यायचं होतं. त्यांनी यायचा प्रस्ताव दिला आम्हाला तो योग्य वाटला आम्ही स्वीकारला आणि त्यांना बरोबर घेतलं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राजकीय युती करताना कुणीही कागद घेऊन येत नाही
“राजकीय युती करत असताना कुणीतरी कागद घेऊन येतं हा माझा प्रस्ताव असं नसतं. अनेक चर्चा होतात त्यातून प्रस्ताव तयार होतो. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो. ज्यांना कोर्ट आणि कोर्टाची ऑर्डर समजते त्या व्यक्तीला हे १०० टक्के माहित आहेत एकनाथ शिंदे हे अपात्र होणार नाहीत. निर्णय अध्यक्ष घेणार आहेत. मात्र काही वेळाकरता असं धरलं की एकनाथ शिंदेंना अपात्र केलंच तरीही ते मुख्यमंत्री राहतील. त्यांना विधान परिषेदवर घेऊन मुख्यमंत्री राहता येतं.
एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत
मुळात एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत. आमच्याजवळ संख्या अशी आहे की कुणीही अपात्र झालंच तरीही काही प्रश्न येणार नाही. पण आम्ही कायद्याची चौकट आम्ही ओलांडलेली नाही. जे काही आहे ते नियमाने केलं आहे. आत्ता ज्या बातम्या चालवल्या जातात त्यामागे एकच कारण आहे की उद्धव ठाकरेंना त्यांचा उर्वरित पक्ष एकत्र ठेवायचा आहे. त्यामुळे ते भाबडी आशा त्यांच्या लोकांना दाखवत आहेत. आता त्यांच्या लोकांनाही माहीत आहे की हे सरकार टिकणार. आमचा कुठलाही बी प्लान वगैरे काहीही नाही. आमचा ए प्लानच आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता
अजित पवार आमच्याबरोबर आले तेव्हा त्यांना हे स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल ते आम्ही दिलं आहे. अजित पवार हे परिपक्व राजकारणी आहेत. त्यांना राजकीय गणित समजतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.