नगर जिल्हय़ातील जवखेडा (तालुका पाथर्डी) येथील दलित हत्याकांडाच्या घटनेपूर्वीही नगर जिल्हय़ात अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करून मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मात्र या घटनेचा साधा निषेधही केला नाही. हजारे गप्प का? त्यांच्यावर कोणाचे दडपण आहे? असे प्रश्न बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी उपस्थित केले आहेत.
पोटभरे यांनी येथे पत्रकार बठकीत १ नोव्हेंबरला नगर येथे होणाऱ्या दलित अत्याचारविरोधी परिषदेची माहिती दिली. सोनई हत्याकांड, खर्डा येथील नितीन सुरवसे या युवकाचा खून व आता जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या यामुळे नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
अण्णा हजारे यांच्या गावापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर दलित हत्येची घटना घडूनही हजारेंनी साधा निषेधही नोंदवला नाही. त्यांना मंत्र्यांचे घोटाळे दिसतात, दिल्लीत जाऊन आंदोलने करता येतात, मात्र त्यांच्याच जिल्हय़ात घडणाऱ्या या घटना दिसत नाहीत का? दलितांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या, अन्यथा अत्याचारग्रस्त भागातील दलितांना आम्हीच शस्त्रे देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. शनिवारी (दि. १) नगर येथे दलित अत्याचारविरोधी परिषदेचे आयोजन केले असून, परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील तरुणांचा संताप दिसून येईल, असेही पोटभरे यांनी सांगितले.
भाजप, शिवसेनेसह एकाही नेत्याने पीडित गावाला भेट देण्याचे धाडस दाखवले नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने मते मागणाऱ्या नेत्यांना दलित हत्याकांडाचा विसर पडल्याचा आरोप पोटभरे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा