आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं. शासकिय कार्यक्रम असल्यामुळे राजशिष्टाचाराप्रमाणे खासदार सुप्रिया सुळेही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र मागच्या बारामतीच्या नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणे याही कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील अबोला प्रकर्षाने दिसून आला.
‘मुद्द्याचं बोला’, अजित पवारांची माध्यमांना समज
याबाबत सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किलपणे या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, माध्यमांना बातमीसाठी काही विषय नसतील तर ते अशी इतर प्रश्नांकडे लक्ष देत बसतात. तुम्ही मुद्द्याचे प्रश्न विचारणार असाल तर मी उत्तर देतो. असे सांगून त्यांनी पुणे विमानतळाचे काम कसे केले आहे, नवीन विकासकामे कशी केली जात आहेत, वाहतुकीच्या समस्या सोडविल्या जात आहेत, याकडे लक्ष वेधले. मात्र सुप्रिया सुळेंशी संवाद का साधला नाही? याबाबत उत्तर देणे टाळले.
एकाच व्यासपीठावर येऊनही अजित पवारांशी थेट संवाद नाही; कारण काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
ते बिझी लोक आहेत, सुप्रिया सुळेंचा टोला
अजित पवारांप्रमाणेच सुप्रिया सुळेंनाही माध्यमांनी हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मला अजितदादांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यांना जायची घाई होती. ते आलेही उशीरा आणि गेलेही लवकर. मी तर आधीच वेळेवर येऊन बसले होते. मी आले आणि माझ्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अजित पवार उशीरा आले. नंतर त्यांनाच पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर झाला होता. घाईगडबड असू शकते. बिझी लोक आहेत.”
अजित पवार म्हणाले, तुम्ही आम्हाला वेडे समजलात का?
शरद पवार गटाने बारामतीचा उमेदवार जाहीर केला, याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, स्वागत आहे. लोकशाहीत सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करू शकतात. महायुतीचा जागावाटपाचा निर्णय झाला की, आम्हीही आमचे उमेदवार जाहीर करू. यावर तुम्हाला हव्या तेवढ्याच जागा मिळणार की कमी मिळणार? असा प्रश्न माध्यमांनी विचारताच अजित पवार थोडे उखडले. तुम्ही आम्हाला वेडे समजलात का? असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित केला. महायुतीमधील तीनही पक्षांना सन्मानजनक जागावाटप होईल, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.