राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी २ जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून विरोधी बाकावरून त्यांनी थेट सत्तेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. अखेर, अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. या संपूर्ण कालावधीत अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. या चर्चांना पूर्णविराम द्यावा याकरता अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या बाबत केलेला हा पत्रप्रपंच”, असं अजित पवारांनी सुरुवातीलाच म्हटलं आहे.

अजित पवारांचं पत्र जसंच्या तसं

सन १९९१ पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरंतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.

संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल या वरच कायम माझा भर राहिला.

पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला.

पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.

विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.

कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.

या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला, कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे.

वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मुलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे. या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो.

शरद पवार गटात नव्याने जोष, तर अजित पवारांचे खास आवाहन?

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा दिल्याने शरद पवार गटातून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, निवडणूक आयोगना शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. या पक्षचिन्हाचं किल्ले रायगडावर जोषात अनावरण करण्यात आलं. नवं चिन्ह मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात उत्साह निर्माण झालेला आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेसाठी पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली. हे करत असताना त्यांनी वडीलधाऱ्या माणसांनी सोबत राहावं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाच आवाहन केल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did ajit pawar take a different decision writing an open letter to the public he said i want to join politics sgk