जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन शिवसेनेत फूट पाडली आणि भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. त्यानंतर, वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली. या दोन्ही पक्ष फुटीला भाजपाला जबाबदार धरले जाते. मात्र, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या दोन्ही पक्षफुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ते लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे बरोबर आल्याने महायुतीचे सरकार भक्कम झाले होते तर मग भाजपाला अजित पवारांची गरज का भासली? असा प्रश्न आशिष शेलारांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, “अजित पवार फुटण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार होते. मुलाच्या आणि मुलीच्यावरील प्रेमापोटी राज्यातील दोन पक्ष फुटले.

उद्धव ठाकरेंनी धोका दिला तर शरद पवारांनी लबाडी केली

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना नेत्यांना चांगले स्थान दिले असते, नगरविकास खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार, अशी चर्चा झाली नसती, तर त्या नेत्यांना असुरक्षित वाटले नसते. त्यामुळे फुटीचे बीज भाजपाचे नाही. शरद पवारांनीही मुलीऐवजी अजित पवारांना नेतृत्व दिले असते, तर अजित पवारांनाही असुरक्षित वाटले नसते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने आणि शरद पवार यांनी लबाडी केल्याने दोघांनाही धडा शिकविला पाहिजे, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका होती”, असं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा >> जागावाटपातील विलंब टाळता आला असता, तर बरे झाले असते..

लबाडी केली तर चाणक्यनीतीतूनच उत्तर देणार

“युतीमध्ये निवडणूक लढवून ठाकरे यांनी २०१९ मध्ये विश्वासघात केला. माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत, असे ठाकरे सांगत होते. आम्ही त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी गेलो नव्हतो, तर तेच आले होते. शरद पवार यांनी २०१४ मध्ये आम्ही न मागता पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेला भाजपापासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी होती, असे त्यांनीच सांगितले आहे. पवार यांनी २०१७ तसेच २०१९ मध्ये आधी सरकार बनविण्यासाठी स्वत:हून प्रस्ताव दिला आणि नंतर विलंब लावून लबाडी केली. आम्ही मैत्रीला जागत शिवसेनेसह तीन पक्षांचे सरकार असावे, अशी भूमिका घेतली असताना पवार यांनी शिवसेनेला सोबत घेण्यास २०१७ मध्ये विरोध केला होता आणि नंतर भूमिका बदलत २०१९ मध्ये त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, हे कुठल्या नैतिकतेत बसते? राजकीय लढाईतून आम्हाला पराभूत केले, तर हरकत नाही. पण धोका किंवा लबाडी केली, तर त्याला चाणक्य नीतीतूनच उत्तर द्यावे लागते. त्यामुळे त्यांना धडा शिकवून भाजपाने काहीही चुकीचे केले नाही किंवा त्याचा आम्हाला प्रश्चात्तापही नाही. पक्ष वाढीसाठी आमचे दरवाजे साऱ्यांनाच उघडे आहेत”, असं आशिष शेलार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did bjp need ajit pawar when the grand alliance government was strong ashish shelar sgk