मराठा आंदोलनाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. कुणबी समाजाला मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळावे याकता मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे, तर मराठा समाजाच्या मागणीसाठी अध्यादेश काढण्याकरता सरकारला फक्त चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्या अल्टिमेटमचाही एक दिवस आज संपला असून सरकारकडे अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सरकार यापुढे काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठ्यांपेक्षाही मोठं आंदोलन करू असा इशारा काही ओबीसी संघटनांनी दिला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> “अचानक पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण म्हणजे…”; मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “पूर्वीपासूनच आम्हाला ओबीसीचं आरक्षण आहे. ओबीसीच्या क्रमांक ८३ वर मराठा आणि कुणबी एकच आहे. असा शासनाचा अध्यादेश आहे. ओबीसीची यादी आहे, पूर्वीपासूनच आहे. ओबीसी आणि आपण समन्वयाने घेऊ. तुम्ही तुमचं घ्या, आम्ही आमचं घेऊ.
“हे वरचे दोन्ही (सरकार) आपलं चांगलं होऊ देणार नाहीत. विनाकारण काहीही सांगतील. त्यांचं तुम्हीही ऐकायचं नाही आणि आम्ही ऐकायचं नाही. आपण समन्वयाने करायचं. मराठ्यांच्या गरीबांच्या पोरालाही मिळू द्या. तुम्हीही घ्या. परत आम्हाला मिळाल्यावर कमी पडलं तर वाढवण्यासाठी तुटून पडू, मी आहे तुमच्यासोबत”, असा विश्वास मनोज जरांगे यांनी दिला.
“सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा आपण एकजीवाने राहू, यांचं ऐकून आपण एकमेकांवर चिखलफेक करायचीही नाही. यांनाच आपल्या जाळ्यात अडकवायचं. एकमेकांसोबत जाण्यासाठी काहीतरी धोरण आखावं लागेल”, असंही ते पुढे म्हणाले.