सोलापूर : काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. कारण आजचा काळ विचारांशी विचारांनी लढण्याचा आहे. देवरा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसचा विचार सोडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
सोलापुरात रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार पवार यांनी मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस राजीनाम्यासह शिंदे गटात झालेल्या प्रवेशावर भाष्य केले. काँग्रेस सोडण्याचा मिलिंद देवरा यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. परंतु आजच्या काळात हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. त्यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. पक्षाने त्यांना अनेक पदे आणि जबाबदाऱ्या दिल्या होत्या. तेवढ्याच विश्वासाने जबाबदाऱ्या सांभाळताना मुरली देवरा यांनी आयुष्यात राजकीय चढउताराच्या प्रसंगात पक्ष सोडण्याचा विचार कधीही केला नव्हता, याचा दाखला देत आमदार रोहित पवार म्हणाले, मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभेची निवडणूक चारवेळा लढविली होती. महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटप समझोत्यानुसार दक्षिण मुंबईची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकते. त्यामुळे देवरा यांना तेथून निवडणूक लढविता येणार नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा. परंतु स्वतःच्या भवितव्याचा विचार करताना पक्षीय विचारांना फारकत द्यायला नको होते. कारण आजची परिस्थिती विचारांशी विचारांनी लढण्याची आहे. त्याकडे देवरा यांनी केवळ स्वतःच्या वैयक्तिक राजकीय हितासाठी दुर्लक्ष केले, असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – महायुतीतील घटक पक्षाचा वापर वाजंत्री म्हणून करणार काय? – सदाभाऊ खोत
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपल्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार पवार म्हणाले, भुजबळ हे काल नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात त्यांच्या शेजारी बसले होते. मराठा आरक्षणासह धनगर, लिंगायत, मुस्लीम आदी सर्व समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. परंतु त्यासंदर्भात भुजबळ व अन्य कोणीही सत्ताधारी भाजप वा मित्र पक्षांचे नेते मोदी यांच्यापुढे साधा ब्र देखील काढण्याचे धाडस दाखवत नाहीत. मात्र दुसरीकडे मराठा-धनगर व इतर जाती-जातींमध्ये भांडणे लावायचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. बाबा रामदेव यांनी ओबीसी समाजाबद्दल अनुचित विधान केले आहे, त्याचा आपण निषेधच करतो. परंतु भाजप व त्यांच्याबरोबर गेलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांनी बाबा रामदेव यांच्या विधानाचा निषेध करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही आमदार रोहित पवार यांनी दिले.