राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं हे कायमच सांगितलं जातं. शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही बोलून दाखवली होती. या सगळ्या चर्चा होत असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती, मात्र हातात असूनही त्यांनी ती संधी घेतली नाही असं सांगितलं आहे. कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात प्रफुल पटेल यांनी हा खुलासा केला आहे
१९७८ पुलोदचा प्रयोग केला आणि मग १९८६ ला शरद पवार काँग्रेसमध्ये परतले
“१९७८ मध्ये शरद पवार काँग्रेसपासून वेगळे झाले होते. त्यांनी पुलोदचा प्रयोग केला. मात्र राजीव गांधी १९८६ मध्ये पंतप्रधान असताना त्यांना कळलं की बहुमत राजीव गांधींबरोबर आहे. त्यामुळे शरद पवार १९८६ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले. राजीव गांधींकडे बहुमताचा कौल होता त्यामुळेच शरद पवार काँग्रेसमध्ये परतले. पुलोदचं सरकार स्थापन करण्याची भूमिका त्यांनी का घेतली? तर शरद पवार यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. त्या सरकारमध्ये हाशू अडवाणी, उत्तमराव पाटील होते हे दोघं भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. महाराष्ट्राच्या भल्यासाठीच त्यांनी निर्णय घेतला होता. काँग्रेसमध्ये शरद पवार आले तेव्हा आम्ही त्यांच्यासह अधिकृत रित्या काम सुरु केलं. काँग्रेसमध्येही अनेक चढाओढी आणि स्पर्धा पाहिल्या. आम्हाला ते सगळं ठाऊक आहे असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यावेळी जशी परिस्थिती आली तशी वाटचाल त्यांनी केली. यशस्वी नेता तोच असतो जो वेळेचं भान ठेवून निर्णय घेतो.”
शरद पवार पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा होती पण..
“अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर एच.डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. पण सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. १३५ पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या दिली.
माझ्या मनात खंत कायम
“या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मी तातडीने शरद पवार यांना भेटलो. आपल्याला मोठी संधी आहे. तुम्ही भूमिका घ्या, अशी गळ मी शरद पवार यांना घातली. त्यावर पवार यांनी १५ मिनिटात बैठक संपवून नंतर बोलू असं म्हणत आलेली सुवर्णसंधी घालवली. काय झालं हे मला कळलं नाही. पण शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत. ते पंतप्रधान झाले नाहीत याची खंत माझ्या मनात कायम आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.” अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं कर्जत येथे अधिवेशन सुरू आहे, त्यातल्या भाषणात शरद पवारांविषयीचं हे गुपित प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.