शरद पवार यांचं राजीनामानाट्य गेल्यावर्षी चांगलंच रंगलं होतं. शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी अजित पवार हे पक्षाबाहेर पडलेले नव्हते. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात हा राजकीय प्रसंग घडल्याचं महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यावेळी अजित पवार हे चांगलेच आक्रमक झाले होते. आता शरद पवारांविरोधात दंड थोपटल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आपल्याकडे आल्यानंतर अजित पवार यांनी त्या राजीनामा नाट्यामागची सगळी बाजू सांगितली आहे. तसंच शरद पवार यांनी राजीनामा देताना काय अट ठेवली होती? हे देखील सांगितलं आहे.
काय घडलं होतं मे २०२३ मध्ये?
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोक माझे सांगाती या शरद पवारांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. या प्रकाशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. या राजीनाम्याच्या काही दिवस आधीच तरुणांना संधी दिली पाहिजे आणि भाकरी फिरवली पाहिजे हे वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे पक्षात काही महत्वाचे बदल होतील अशी अपेक्षा होती. मात्र मागच्या वर्षीच्या मे महिन्यात त्यांनी स्वतःच राजीनामा दिला आणि नवा अध्यक्ष निवडा असं सांगितलं. हा तिथे जमलेल्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकासाठी धक्काच होता. शरद पवारांनी हा निर्णय त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांनाच सांगितला होता. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्या ठिकाणी आंदोलनही झालं होतं. त्याचप्रमाणे त्यावेळी सगळ्याच इतर नेत्यांनीही त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र शरद पवार निर्णयावर ठाम होते. हा प्रसंग घडला तेव्हा पडद्यामागे काय अट शरद पवारांनी ठेवली होती हे सगळंच आता अजित पवारांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले अजित पवार शरद पवारांबाबत?
अजित पवार म्हणाले, “मी राजीनामा देतो. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा. हे शरद पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. आम्ही ते मान्य केलं होतं. मात्र चार दिवसांत काय चक्रं फिरली माहीत नाही. त्यांनी राजीनामा मागे घेतला. खरंतर त्यांचा राजीनामा हा कुणीही मागितला नव्हता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊन झाला होता. तरीही त्यांनी असं का केलं ते माहीत नाही.” असंही अजित पवार म्हणाले.
हे पण वाचा- “..म्हणून शरद पवारांची साथ अजित पवारांनी सोडली”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मी मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून हपापलेला माणूस नाही
मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून काही हपापलेला माणूस नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या होत्या. त्यावेळीही वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रीपद दिलं ते आम्ही घेतलं. त्यांचे आदेश शिरसावंद्य मानले. मी त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो. त्यावेळी छगन भुजबळ किंवा आर. आर. पाटील मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र तसं झालं नाही असंही आज पवारांनी स्पष्ट केलं.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आमच्या पक्षातील अनेक आमदारांनी सांगितले की, भूमिका घ्या. पण वरिष्ठ काही ऐकायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे सरकार जेव्हा जाणार हे स्पष्ट झालं, तेव्हा माझ्या दालनात सर्व आमदारांनी सह्या करून आपण भाजपाबरोबर सरकारमध्ये जाऊ, हे मान्य केले. तेही (भाजपा) आम्हाला घ्यायला तयार होते. पण वरिष्ठांनी ऐकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही पुन्हा वरिष्ठांना भेटून याबाबत विचारणा केली. पण वरिष्ठांनी उत्तर दिले नाही. शेवटी २ जुलै रोजी आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना आम्ही निवडणूक आयोगासमोर गेलो आणि आमची भूमिका मांडली. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्याबाजूने आले. कारण त्यांनाही कळत होते की, आम्ही घेतलेला निर्णय पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतला” असंही अजित पवार म्हणाले.