राजस्थानात एकनाथ शिंदे हे भाजपाच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताच्या एका पोस्टरवर हिंदूहृदय सम्राट असा उल्लेख होता. जे पोस्टर पोस्ट करत ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणायची नवी पद्धत नव्या हिंदुत्वात आलेली दिसते असंही म्हटलं. त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हटलं गेलं तेव्हा विश्वप्रवक्ते कुठे होते? असा सवाल शीतल म्हात्रेंनी केला आहे.
काय म्हणाल्या शीतल म्हात्रे?
हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा ‘जनाब’ म्हटलं गेलं तसंच हिंदूहृदय सम्राट ही उपाधी बाळासाहेबांच्या नावापुढे लावण्यासाठी ज्यांना लाज वाटत होती तेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) सत्तेत होतात. मला आमच्या महाज्ञानी विश्वप्रवक्त्यांना विचारायचं आहे जेव्हा बाळासाहेबांना जनाब म्हटलं गेलं तेव्हा तुम्ही गप्प बसला होतात. राजस्थानमध्ये शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी, एकनाथ शिंदेंवर प्रेम करणाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केला तर तुमच्या पोटात का इतकं ढवळलं गेलं आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी स्वतःला पक्षप्रमुख असंही म्हटलं नाही. त्यांनी स्वतःला मुख्य नेते असं म्हटलं आहे. आम्हाला या पदाची कधी गरज नव्हती. कारण आम्हाला माहीत आहे की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहे. त्यामुळे उगीचच दोरीला साप म्हणून धोपटू नका. आपण हिंदूहृदय सम्राट सत्तेत असताना का नाकारली याचं उत्तर जनतेला द्यावं.” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
“हिंदूहृदयसम्राट आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःच सांगितलं पाहिजे. कारण त्यांचा पक्ष म्हणजे जो काही गट त्यांनी स्थापन केला आहे तो गट आणि अजित पवार गट हे भविष्यात भाजपात विलीन होणार आहेत. कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्यांनी स्वतःला कितीही पदव्या बाहेर लावल्या तरीही महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची यांची हिंमत नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ तिथे असा पदव्या लावत आहेत. उद्या अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रचाराला गेले तर तिथेही असंच करतील. ” असा टोला राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील
“एकनाथ शिंदे हे महान नेते आहेत. २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले. पण हे सगळं तात्पुरतं आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते पहावं लागेल आम्हाला. आम्ही इतके वर्षे सन्मानीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसह काम केलं. त्यांचा संघर्षही पाहिला. त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केली नाही. आता गद्दारांना आणि बेईमान्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल. भाजपानेच केलं आहे, राजस्थानच्या भाजपाला महाराष्ट्रात काय सुरु आहे काय माहीत आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन गेले असतील प्रचाराला.”
काय आहे पोस्टरचं प्रकरण?
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स राजस्थानमध्ये लावण्यात आले होते त्यावर हिंदूहृदय सम्राट एकनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर टीका सुरु झाली आहे.