शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातल्या आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी एक छोटेखानी भाषणही केलं. माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. मात्र आनंद आश्रम या ठिकाणी जायचं त्यांनी टाळलं. उद्धव ठाकरेंनी असं का केलं? याचं कारण समोर आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं का टाळलं?
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं टाळलं असल्याचं बोललं जातं आहे. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच.
आनंद आश्रम काय आहे?
ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आणि शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असे दोन गट पडल्यानंतर आनंद आश्रमात कोण जाणार? यावरून दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यानंतर काही दिवस दोन्ही गट आनंद आश्रम या ठिकाणी जात होते. मात्र आज सकाळीच या आनंद आश्रम या जागेवर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी त्यामुळेच या आश्रमात येणं टाळलं असं बोललं जातं आहे.
“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”
ठाण्यातल्या भाषणात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरात उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्याचा दौरा केला. ठाण्याच्या दौऱ्यात ते आनंद आश्रमात येऊ नयेत म्हणूनच तिथे बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला असल्याची चर्चा ठाण्यात रंगते आहे. आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार होते. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा मागच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर बरोबर सव्वा महिन्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. एकनाथ शिंदेची साथ ४० आमदारांनी दिली आहे. तसंच शिवसेना आता दोन वेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. अशात आज उद्धव ठाकरे ठाण्यात आल्यानंतर आनंद आश्रम या ठिकाणी जातील असं वाटलं होतं त्यामुळेच शिंदे गटाकडून हा फलक लावण्यात आला. ज्यामुळे उद्धव ठाकरे हे टेंभी नाक्यावर गेले पण आनंद आश्रमात जाणं त्यांनी टाळलं ही चर्चा होते आहे.