Walmik Karad Surrender Case : बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले वाल्मिक कराड शरण येताना अजित पवारांच्या ताफ्यातील एका गाडीतून आल्यचा आरोप केला जात आहे. अजित पवार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यास आले होते तेव्हाही ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात होती, असा विरोधकांचा दावा आहे. मात्र, या गाडीच्या मालकाने अनेक आरोप फेटाळून लावले आहेत. या गाडीचे माल शिवलिंग मोराळे यांनी टीव्ही ९ शी संवाद साधताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
वाल्मिक कराडकडे गाडी कशी आली?
शिवलिंग मोराळेंच्या गाडीत बसून वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात शरण गेले. ती गाडी त्यांच्याकडे कशी आली? असा प्रश्न विचारला असता शिवलिंग मोराळे म्हणाले, मला माध्यमातून कळालं की वाल्मिक कराड शरण जाणार आहेत. त्यामुळे मी सीआयडी कार्यालयाच्या चौकात आधीच जाऊन थांबलो होतो. अचानक मला वाल्मिक कराड दिसले. मी गाडी उभी केली. त्यांनी मला सांगितलं की सीआयडी कार्यालयात नेऊन सोड असं सांगितलं. त्यामुळे मी त्यांना माझ्या गाडीत बसवलं, मी स्वतः गाडी चालवली. ते ज्या गाडीतून आले होते त्यातील दोघेजणही माझ्या गाडीत बसले आणि ती गाडी निघून गेली. मी तिथून सीआयडी कार्यालयात नेऊन सोडलं आणि मी बाहेर निघून आलो.वाल्मिक कराडबरोबर आलेल्या दोघांना मी ओळखत नव्हतो. शरण जाण्यापुरता माझ्या गाडीचा वापर झाला. बाकी ते कुठे होते हे मला माहीत नाही.
हेही वाचा >> वाल्मीक कराडला तुरुंगात ‘व्हीव्हीआयपी’ वागणूक? मुख्यमंत्री म्हणाले…
हिवाळी अधिवेशनात गाडी कुठे होती?
हीच गाडी हिवाळी अधिवेशनात नागपुरात होती का? यावर ते म्हणाले, माझी गाडी नागपुरात नव्हती. १६ तारखेला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ बीडमधील जिल्हा अधिक्षक कार्यालयात मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला मी स्वतः उपस्थित होतो. तेव्हा मी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. त्या मोर्चानंतर मी गाडी घेऊन छत्रपती संभाजीनगरला गेलो. तेथील रत्नाप्रभा शोरुमला मी माझी गाडी लावली. त्यानंतर मी विमानाने नागपूरला गेलो.मी दन दिवस नागपूरमध्ये राहिलो. परत येताना मी संभाजीनगरला ट्रॅव्हल्सने प्रवास केला. आल्यानंतर मी गाडी १७ तारखेला माझ्या ताब्यात घेतली. मी माझी गाडी घेऊन बीडला आलो. चालकाने मला बीडला सोडलं, त्यानंतर तो त्याच्या गावी गाडी घेऊन गेला. हिवाळी अधिवेशनादरम्यान माझी गाडी नागपुरात नव्हती तर संभाजीनगरला होती.
अजित पवारांच्या ताफ्यात कोणती गाडी?
अजित पवार मस्साजोगमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याही ताफ्यात तुमची गाडी होती, आणि त्या ताफ्यात वाल्मिक कराड होते का? यावर शिलिंग मोराळे म्हणाले, ही माहिती चुकीची आहे. मी त्यादिवशी माझ्या खासगी कामानिमित्त केज परिसरात गेलो होते. परत येताना सकाळी साडेअकरा वाजता नाश्ता केला. तिथून येळम घाट येथे होतो. दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत माझी गाडी येळमघाट येथे उभी होती. अजित पवार पाचच्या दरम्यान बीड दौऱ्याला आले होते. त्या दौऱ्यात मीही माझ्या मित्राच्या गाडीत होतो. साडेपाच-पाऊणेसहाच्या दरम्यान दादा निघून गेले, तेव्हा मी माझ्या मित्राच्या गाडीतून येळमघाट येथे आलो. माझी गाडी घेऊन मी घरी गेलो. त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्यात माझी गाडी असण्याचा प्रश्नच येत नाही.