Raosaheb Danve on Abdul Sattar : आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं आहे. सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद का मिळालं नाही? याचं कारण सांगताना रावसाहेब दानवे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘अब्दुल सत्तारांनी आधीच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे मंत्रिपद गेलं’, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
“सिल्लोडमधील प्रत्येक चौकाचं नाव काय आहे हे पाहा. सिल्लोडमधील एकाही चौकात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा जवाहरलाल नेहरु यांचे नाव नाही. नावावरून तर त्या गावची रचना कळती ना? मग त्यांची विचारधारा कोणती? म्हणजे खायचं येथील आणि गायचं कुठलं? मी आजही म्हणतो की पाकिस्तानसारखी परिस्थिती सिल्लोडमध्ये आहे”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.
“महापुरुषांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सिल्लोडमध्ये सुरु आहे. सिल्लोडच्या जिल्हा परिषदेची चार एकरची जागा महापालिकेत घेतली, आता त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधतील, त्यानंतर ते विकून टाकतेन आणि पैसे घेतील. मात्र, तरीही सिल्लोडची जनता गप्प आहे. तसेच अब्दुल सत्तारांचं मंत्रिपद हे त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे गेलं”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला.