Eknath Shinde Dasara Melava 2023 Marathi News : मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानात तर, ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे झाला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोहोंच्या भाषणासाठी दोन्ही ठिकाणी असंख्य शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानातून ठाकरेंवर तोफ डागली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंचं तर काही कर्तृत्व नव्हतंच. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे. तेव्हा एका बैठकीत धर्मवीर आनंद दिघे हे राज ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले बोलले. त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं त्याचा साक्षीदार मी आहे. आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर ते बघायला आले नाहीत. अंत्ययात्रेलाही आले नाहीत. आम्हीच त्यांची सगळ्यात मोठी समाधी बांधली. या समाधीला भेटदेखील दिली नाही. मी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस होता. त्यांच्याकडे काय संपत्ती असणार” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> “…त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप
“म्हणून मी एवढंच सांगतो की ते छाती बडवतात की मर्द आहोत, मर्द आहोत. मग मर्द आहोत हे सांगावं का लागतं? ही सभा बाळासाहेबांच्या शिवसैनिक मर्दांची आहे. तिकडे आहे ती हुजरे आणि कारकुनांची आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा >> “माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत…”, मराठा आरक्षणासंदर्भात शिंदेंचं मोठं वक्तव्य; घेतली शिवरायांची शपथ
यांना खोके नाही, कंटेनर लागतो
“रक्ताचं नातं सांगण्याऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांवर आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. मी सांगितलं यांचं प्रेम बाळासाहेब, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो.योग्य वेळेला बोलेन, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं
इंडिया आघाडी या दहा तोंडी रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा आपण देणार आणि मोदींना बळकटी देणार. बाळासाहेब म्हणाले होते की एकदिवस मला पंतप्रधान बनवा, मी राममंदिर बांधतो आणि कश्मीरमधील ३७० कलम हटवतो. आता मोदींनी राम मंदिर बांधलं आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आणि आपल्या सर्वांना उद्घाटनाला जायचं आहे. विरोधक कोणत्या तोंडाने जातील माहीत नाही. मोदींच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्यापाठीमागे उभा राहील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.