मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम असून, पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात काही भागांत चोवीस तासांत ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. मात्र अचानक कोकण किनारपट्टीसहीत मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर एवढा पाऊस का पडतोय?
या ठिकाणी अतीवृष्टी
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे गेल्या चोवीस तासांत तब्बल ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तळा, माणगाव, वैभववाडी, मालवण, संगमेश्वर आदी ठिकाणी २१० ते २४० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. वेंगुर्ला, कल्याण, महाड, पालघर, अंबरनाथ, सावंतवाडी, ठाणे, उल्हासनगर, पनवेल आदी भागांत १५० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. उरण, दापोली, डहाणू, पेण, पाली आदी ठिकाणी १२० ते १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईतील सांताक्रुझ केंद्रावर १५३ मिलिमिटर पाऊस नोंदविला गेला. कोल्हापूर येथील गगनबावडा येथे चोवीस तासांत २५० मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर, राधानगरी आदी भागांत १०० ते १४० मिलिमिटर पावसाची नोंद झाली.
मुंबईतील परिस्थिती काय?
मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मंगळवारीही मुसळधार पाऊस कायम राहिला़ मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळय़ा भागात १४० ते १५० मिमी झाली. उसंत न घेता सलग दुसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर लोकल रेल्वे सुरू असली तरी वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात पाऊस कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळय़ा भागांत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, २४ तासांत १४० ते १५० मिमी पाऊस पडला.
पावसाचा परिणाम काय?
पवासामुळे कोकण आणि आजूबाजूच्या भागात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत होत असले, तरी काही भागांत तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या पेरण्या आता झपाट्याने मार्गी लागत आहेत.
मराठवाडा, विदर्भ परिस्थिती काय?
मराठवाड्यात सध्या पाऊस कमी असला, तरी काही ठिकाणी दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. विदर्भातही पुढील चार ते पाच दिवसांच्या कालावधीत पावसाची शक्यता कायम आहे.
एवढा पाऊस का?
अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत असल्याचा फोटो ५ जुलै रोजी हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता. या फोटोसोबत होसाळीकर यांनी किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती.
पुढील काही दिवसांसाठी इशारा
मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ ते ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.