लॉकडाऊनच्या काळात दारूचा मुद्दा चांगलाच गाजला होता. देशात करोना रुग्णांचा आलेख वाढत असताना दारूच्या दुकानासमोर रांगाच- रांगा पाहायला मिळत होत्या. लॉकडाऊनबाबतचे निर्बंध कठोर झाले तर दारू प्यायला मिळणार नाही, म्हणून अनेकांनी आपल्या घरात दारूचा साठा करून ठेवला होता. आता या घटनांना अनेक महिने उलटली आहेत. पण एकांतात बसल्यानंतर तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की दारूच्या दुकानात बीअर, व्हीस्की, रमपासून सगळ्याच प्रकारचे मद्य मिळते, असं असूनही त्याला वाईन शॉप का म्हणतात?
याचे उत्तर देण्यापूर्वी आपल्याला दारूचा इतिहास माहीत असायला हवा. मद्याच्या दुकानांना वाईन शॉप पहिल्यांदा कधी म्हटलं गेलं? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, ५ हजार वर्षांहून अधिक काळापासून जगात मद्य प्राशन करायला सुरुवात झाली असावी, असं उपलब्ध पुराव्यानुसार सिद्ध होते. सर्वप्रथम द्राक्षांवर केलेल्या प्रयोगातून दारूचा शोध लागला. आजही द्राक्षांपासून बनवलेली वाईन प्रचलित आहे. असं म्हटलं जातं की प्राचीन काळात मानवाने मादक वनस्पतींचं सेवन करत असताना काळाच्या ओघात दारूचा शोध लावला.
राजेशाहीत वाईनचा सर्वाधिक वापर
प्राचीन काळात राजेशाही अस्तित्वात असताना बीअर, व्हिस्की किंवा रमऐवजी सर्वात जास्त वाईन प्यायली जात असे. त्याकाळात सर्व प्रकारच्या मद्याला ‘वाईन’ असेच म्हटले जायचे. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने दारूच्या दुकानांना ‘वाईन शॉप’ असं म्हटलं जाऊ लागलं.
भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक मद्यपान केले जाते?
एका अहवालानुसार, २०२२ मध्ये भारतात सर्वाधिक दारू पिणारे लोक छत्तीसगडमध्ये आहेत. येथील सुमारे ३५.६ टक्के लोक मद्यपान करतात. याशिवाय त्रिपुरात ३४.७ टक्के लोक दारूचे सेवन करतात. यानंतर आंध्र प्रदेश, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांचा क्रमांक येतो.
आर्थिक संशोधन संस्था ICRIER आणि कायदा सल्लागार संस्था PLR चेंबर्स यांच्या संशोधनानुसार, भारतात सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या लोकांच्या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या २० कोटींहून अधिक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मद्यपान करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.