सोलापूर : जबाबदारीच्या पदावर असलेले राजकीय नेते दररोज सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्ये करतात. त्यांच्यावर सेन्सॉर का नाही, असा सवाल करीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी, सेन्सॉर बोर्डावर नाट्य आणि सिनेमा क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेली माणसे काम करतात आणि मग ते सांगतात हे नको ते नको. त्यामुळे चांगल्या नाटकाची आणि सिनेमाची वाट लागते, अशी खंत व्यक्त केली.‘प्रिसिजन फाउंडेशन’ आयोजित ‘प्रिसिजन वाचन अभियान’ या कार्यक्रमात अमोल पालेकर हे प्रकट मुलाखत देताना बोलत होते.
डॉ. अस्मिता बालगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत अमोल पालेकर व संध्या गोखले यांनी आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. सुरुवातीला ‘ऐवज एक स्मृतिगंध’ या अमोल पालेकर लिखित आत्मचरित्राचे प्रकाशन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात वापरलेल्या क्यूआर कोडमुळे त्या काळातल्या त्यांच्या चित्रपटांसह नाटक आणि पोस्टरचे दर्शन घडतं. ही एक अभिनव कल्पना ‘ऐवज एक स्मृतिगंध’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने मराठी साहित्यात प्रथमच आणली.
यावेळी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, सत्यदेव दुबेंकडून खूप शिकायला मिळालं. शब्द, वाक्य, न बदलता त्याचा अन्वयार्थ वेगळा कसा शोधायचा हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. स्त्री ही कणखर असतेच. कितीही हालअपेष्टा झाल्या तरी ती ठामपणे उभी राहते. बाई ही अतिशय कर्तबगार असतेच. माझ्या आईपासून पुढे ज्या स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या त्या अशाच भेटल्या. त्यामुळे स्त्रीवादी कलाकृती घडल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यात रसिकांनी, सामान्य लोकांनी मनापासून उतरावं. तेही काठावरून नाही. आपल्या धोतरावर डाग पडणार नाहीत नां, अशी भीती न बाळगता या लढ्यात उतरावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सेन्सॉरशिपच्या विरोधात जेव्हा विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे उभे राहिले, तेव्हा रसिकांनी त्यांना साथ दिली नाही, अशी खंतही पालेकर यांनी व्यक्त केली. आजही एखादी घटना घडते, तेव्हा लोक त्याचे चित्रिकरण करतात. पण तिथे जाऊन अन्याय थांबवत नाही, ही दुर्दैवी बाबही त्यांनी नमूद केली. आपण नास्तिक असणं याचा नकारात्मक अर्थ घेतो. मी नास्तिक आहे. तुम्ही तसंच व्हावं असं मुळीच म्हणणं नाही. माझी श्रद्धा माणसांवर आहे, माणुसकीवर आहे..! आज आपण ‘एआय’च्या दुनियेत आहोत, जिथे माणसाच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहायची वेळ आलीय, असे मत अमोल पालेकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी मानले.