राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली व अब्दुल सत्तारांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. शिवाय, सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात आली. याचबरोबर राज्याच्या महिला आयोगानेही सत्तार यांच्यावर कारवाईसाठी कालच पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाला एक सवाल केला आहे. ज्यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा – … तेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली – सुषमा अंधारेंचं विधान!
सुषमा अंधारे म्हणतात, “मला महिला आयोगालाही अत्यंत नम्रपणे सांगावं वाटतय, की अब्दुल सत्तारांवर तक्रार दाखल होण्यासाठी तुम्ही ज्यावेळी तत्परता दाखवता, ती तत्परता तुम्ही गुलाबराव पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल करणे किंवा त्यांना नोटीस पाठवणे, यासाठी का दाखवू नये? ती दाखवायला हवी. कारण, सर्व आरोपींची मानसिकता सारखीच आहे. माझ्या दृष्टिकोनातून हे सर्व आरोपीच आहेत आणि सगळे गुन्हेगारच आहेत. कारण, हे महिलांचा सातत्याने अपमान करतात, महिलांना जाणीवपूर्व दुय्यम वागणूक देतात.”
हेही वाचा – ‘जे’ औरंगजेबलाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार
याशिवाय, “एकतर महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आहे आणि त्यात कोणत्या महिलांबद्दल बोलावे याचा जणू त्यांना परवाना मिळालेला आहे. म्हणजे ठरवून विवक्षित वर्गातील,विवक्षित जात, समुदायातील, विवक्षित विचारधारेच्या, विवक्षित अशा ठराविक महिलांबद्दलच अशी वक्तव्य आणि अशा घटना सातत्याने घडत राहतात.” असंही अंधारे म्हणाल्या आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यात “मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्धार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे.”
हेही वाचा -“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला!
“याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे,” असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.