राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पटेल यांनी काही वेळापूर्वी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी पटेल यांचं नाव जाहीर केल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांचा खासदारकीचा चार वर्षांचा कालावधी अद्याप बाकी आहे तरीदेखील पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी का दिली असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. तर विरोधकांनी दावा केला आहे की, आमदार अपात्रतेप्रकरणी अद्याप निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच याप्रकरणी निकाल देतील. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला या निकालाबाबत भीती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाने राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे की, “सध्या अजित पवार गटात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेत त्यांनी पुन्हा एकदा पटेल यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.” जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावर आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी आमच्या पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, माझी राज्यसभेची टर्म अजून चालू असताना मी परत एका उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. मला त्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की, काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला काही ना काही घडामोडी कराव्या लागतात.

पटेल म्हणाले, विरोधी पक्षांमधील काही नेते सध्या आमच्याकडे येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे येणारा काळ तुमच्यासमोरचं चित्र स्पष्ट करेल. तसेच मी आता उमेदवारी अर्ज का भरला तेदेखील स्पष्ट होईल. मला खात्री आहे की, राज्यसभेवर माझी बिनविरोध निवड होणार आहे. त्यामुळे आमची ही रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे. माझी साडेचार वर्षे बाकी असताना पुन्हा उमेदवारी अर्ज का भरला? देशात काही घडलं नाही तरी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही नवीन गोष्टी घडत राहतील.

हे ही वाचा >> पिताश्रींच्या पावलावर अशोक चव्हाणांचे पाऊल !

पटेलांच्या जागेवर दुसऱ्या नेत्याला संधी मिळणार

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे त्यांची सध्याची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. पटेल आगामी निवडणुकीत जिंकले तर त्यांना आधीच्या जागेवर राजीनामा द्यावा लागेल आणि त्या रिक्त जागेवर अजित पवार गटाकडून दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.