Khokya Bhosale to be produced in Prayagraj Court : भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीडमधील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली आहे. एका इसमाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्यचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं आणि थेट प्रयागराज गाठलं. तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला लगेच महाराष्ट्रात आणता येणार नाही. आज त्याला प्रयागराज सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तिथे बीड पोलीस त्याचा ट्रान्झिट रिमांड मागतील. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर बीड पोलीस त्याला हवाईमार्गे बीडला नेतील.

खोक्याला आधी प्रयागराज न्यायालयात का नेलं जाणार?

याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवट म्हणाले, “खोक्याला परराज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला तत्काळ महाराष्ट्रात आणता येणार नाही. आधी तिथल्या स्थानिक कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागेल. ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे, ज्या मार्गाने कमी वेळेत त्याला इथे आणता येईल अशा मार्गाने त्याला बीडमध्ये आणलं जाईल. आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत त्याला बीडमध्ये आणलं जाईल. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

कायदेशीर प्रक्रिया काय?

कोणत्याही गुन्हेगाराला दुसऱ्या राज्यात अटक झाली असेल तर त्याला प्राथमिक न्यायालयीन प्रक्रियेसाठी तिथल्या स्थानिक न्यायालयात हजर केलं जातं. त्यानंतर न्यायालय त्याला ट्रान्झिट रिमांड देऊ शकतं. त्यामुळे खोक्याची प्रयागराज न्यायालयात प्राथमिक सुनावणी होणार आहे. प्रयागराज न्यायालयात प्रारंभिक न्यायिक कार्यवाही आटोपल्यानंतर आरोपीला महाराष्ट्रात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. तिथल्या न्यायालयाने त्याची ट्रान्झिट रिमांड दिल्यानंतर महाराष्ट्रातील न्यायालयात (बीड) पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाईल.

कोण आहे खोक्या भोसले?

खोक्या भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. गोल्डमॅन म्हणूनही सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे. शिरुर कासार परिसात खोक्याने गेल्या काही वर्षांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळेच तो हे करू शकला असा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. तो जिल्ह्यात एखाद्या व्हीआयपीसारखा वावरतो, महागडी आलिशान कार, हातात सोन्याचे अनेक ब्रेसलेट व कडे, गळ्यात सोन्याच्या चेनी परिधान करून तो बीडमध्ये फिरतो, त्यामुळे त्याला गोल्डमॅन म्हटलं जातं.