सातारा: चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, अनेक वर्षे सत्तेत प्रमुखपदी असताना शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. उलट त्यांनी १९९४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केला.

सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, की गेल्या पंच्चाहत्तर वर्षात पवार हे किमान ६५ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. मग एवढा प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगत असताना या समाजाचे दु:ख पवारांना समजले नाही का ? या कालावधीत त्यांनी समाजाला आरक्षण देणे शक्य असताना ते का दिले नाही. उलट १९९४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले. आज या विषयावर सर्वत्र गोंधळ सुरू असताना पवारांना हे प्रश्न कुणीही विचारत नाही. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवून घेणाऱ्या पवारांनी या प्रश्नांची उत्तरे समाजाला दिली पाहिजेत. त्यांनी मुद्दामहून केलेल्या दुर्लक्षामुळे समाज आज या स्थितीला आला आहे. यास सर्वस्वी पवार जबाबदार असल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. पवार सध्या अनेक ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत. या वेळी त्यांनी वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा : Eknath Shinde: निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; कारण काय? शिंदे गटाचे नेते म्हणाले…

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या नव्या मागण्यांबाबत मतभेद व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, की तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करत आहात की तयार करण्यासाठी. समाजाला काहीतरी मिळावे यासाठी आंदोलन असते. आंदोलनाच्या निमित्ताने सगळ्या समाजाचा राजकीयदृष्ट्या वापर सुरू आहे. निवडणुका येतील जातील परंतु या चुकांचे परिणाम भविष्यात संबंधितांना भोगावे लागतील. गंमत अशी, की एवढे वर्षे पवार सत्तेत असताना ही अशी आंदोलने होत नव्हती. ते विरोधी पक्षात गेले, की लगेच ही अशी आंदोलने कशी सुरू होतात. हा सारा प्रकार समाजदेखील पाहात आहे. जनतेला हे कळत नाही असे समजू नका. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला.

महायुतीच्या माध्यमातून राज्यात अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. नव्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येऊन महायुतीचे सरकार येईल. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण राज्यभर फिरणार असल्याचे उदयनराजे यांनी या वेळी जाहीर केले.

हेही वाचा : Baba Siddique Death Case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट; हल्लेखोर ‘या’ ॲपवरून करत संभाषण

माझे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील. त्यांच्यासाठी गावोगावी जाऊन प्रचार करणार आहे. आम्ही दोघांनी केलेल्या कामांच्या जीवावर मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असेही उदयनराजे म्हणाले.