कुख्यात दाऊद इब्राहिमला त्याच्या अटींवर भारतात परत आणण्याचा निर्णय घेणे कितपत योग्य होते, असा सवाल करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. राम जेठमलानी दाऊद संदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते, हे स्पष्ट करून ते म्हणाले, गुन्हेगारांच्या अटी मान्य करणे कितपत योग्य आहे. ज्याने देशात अनेक जणांची हत्या केली, त्याच्या अटी मान्य का करायच्या. त्याचबरोबर दाऊद भारतात परत येण्यास खरंच तयार आहे का, हे कसे निश्चित करणार. जेठमलानी यांनी याबद्दल केंद्रीय गृहसचिवांना माहिती का दिली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोल्हापूरमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्रीपदावर असताना शरद पवार यांनी दाऊदला भारतात परत आणण्याची संधी दवडली, असे सांगत समाजमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरून शरद पवार यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याला उत्तर देताना गुन्हेगारांच्या अटी का मान्य करायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील पावसाची परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे सांगून ते म्हणाले, हवामान खात्याने १५ जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला, तर सर्वांनाच दिलासा मिळेल. यूपीए सरकारने ऊस उत्पादकांच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका कायम घेतली होती. दहा वर्षे कृषिमंत्री म्हणून माझ्यावर ही जबाबदारी होती. आता सरकार बदलले आहे. शेतकऱय़ांसाठी आमच्याविरोधात लढणारे आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या पुढे दहा पावले जाऊन शेतकऱय़ांच्या हितासाठी काम केले पाहिजे, असा टोला त्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader