राष्ट्रवादी काँग्रेस २ जुलैपासून मोठी फूट पडली आहे. कारण अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन आपल्यासह आणखी दिग्गजांनाही नेलं आहे. अशात शरद पवार यांनी ३ जुलैपासूनच म्हणजेच सोमवारपासूनच पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आज शरद पवार येवला या ठिकाणी सभा घेणार आहेत. अजित पवारांनी बुधवारी जे भाषण केलं त्यात शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. आज शरद पवारांनी त्याचवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला आहे.
हे पण वाचा “राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही पवारांचीच खेळी”, शरद पवारांबरोबर ४० वर्षे काम केलेल्या सहकाऱ्याचा दावा
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?
“मी का निवृत्त व्हायचं? मी काम करु शकतो, काम करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. त्यावेळी संपूर्ण पक्षाने मला सांगितलं की तुम्ही निवृत्त होऊ नका. तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये लोक रडू लागले आणि सांगू लागले की तुम्ही निवृत्त व्हायचं नाही. मी लोकभावनेचा आदर केला आणि राजीनामा मागे घेतला. आज मला कुणी का म्हणत आहेत की निवृत्त व्हा? मी लोकांमध्ये जातो आहे, त्यांचे प्रश्न मांडतो आहे यात चुकीचं काय? मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यात वेगळी अशी काय जबाबदारी आहे? मी संघटनेचा प्रमुख आहे आणि संघटनेसाठी काम करतो आहे. मी कुठल्या वयात थांबलं पाहिजे हे तुम्ही का सांगत आहात? मी निर्णय घेऊ शकतो.” असं म्हणत अजित पवार आणि छगन भुजबळांना सुनावलं आहे.
हे पण वाचा “मी सुप्रियाला म्हटलं होतं तू शरद पवारांना समजावून सांग…”, अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
माझ्या वयाचा संदर्भ का काढला जातो?
“सातत्याने माझ्या वयाचा संदर्भ का काढला जातो? मोरारजी देसाई कुठल्या वयात पंतप्रधान झाले होते देशाला माहित आहे. मला पंतप्रधान व्हायचं नाही, मंत्री व्हायचं नाही. संघटनेत काम करायचं आहे. त्यासाठी वयाचा प्रश्नच येत नाही. मी टायर्डही नाही रिटायर्डही नाही. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी नवं नेतृत्व तयार करायचं आहे त्यासाठी मेहनत घेतो आहोत.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नवी पिढी तयार करणं हेच आमचं लक्ष्य
“नवी पिढी तयार होते आहे आणि नवं नेतृत्व तयार करणं हेच माझं काम आहे ते मी करत राहणार आहे. जे काही घडलं तो माझ्यासाठी झटका नव्हता. कारण अशी वेळ याआधी माझ्यावर अशी वेळ आली आहे. मी त्याला तोंड दिलं आहे तसंच आत्ताही तोंड देतो आहे. पक्षा कसा उभा करायचा याचं चित्र माझ्या डोक्यात तयार आहे. जे लोक गेले त्याचं मला वाईट वाटलं पण हा माझ्यासाठी झटका वगैरे नाही.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे भाष्य केलं आहे.