कराड : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला नको इतके महत्व का देताय? तेथील कन्नड माध्यमं आमच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्य दाखवतात का हो? असे प्रश्न राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड्मध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री अमुक असे म्हणाले, म्हणून त्यांना एवढ महत्व देण्याची अजिबात गरज नसल्याचे मंत्री देसाई म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत महापुरुषांबद्दल वक्तव्य करतात. त्यावर प्रसंगी आंदोलन करू असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाने दिला असल्याबाबत विचारले असता शंभूराज म्हणाले की त्याबद्दल आम्ही वेळोवेळी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा, हिंदुस्तानचा काल, आज आणि पुढील हजारो वर्षे आदर्श राहतील असे ठामपणे सांगितले आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे. आता राज्यपालांच जे वक्तव्य आहे त्याबद्दल वरिष्ठ भूमिका घेतील असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांना हटवाव अशी तुमची भूमिका आहे का? असे विचारले असता, आमची भूमिका पक्षप्रमुख, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे. आम्ही राज्यपालांनी केलेल्या विधानाशी बिलकुल सहमत नाही. आम्हाला ते पटलेल नसल्याचे शंभूराज यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचेविषयी राहुल गांधींचे वक्तव्य झाले त्यावेळी तुमची शिवसेना रस्त्यावर उतरली होती. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोलले गेल्यानंतर आपली शिवसेना रस्त्यावर उतरली नसल्याबद्दल टीका होत असल्याचे निदर्शनास आणताच त्यांचीतरी शिवसेना कुठे रस्त्यावर उतरली का? आम्ही सर्व मंत्र्यांनी राज्यपालांच वक्तव्य बरोबर नाही, आम्हाला कुणालाही ते मान्य नाही, आम्हाला शिवाजी महाराज आदर्श आहेत असे कठोर शब्दात बोलून दाखवले असल्याचे सांगताना महाराष्ट्रातील जनता अशाप्रकारचे वक्तव्य सहन करणार नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.