गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्यासह काही तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगेश साबळे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. याप्रकरणी आता तिघांनाही जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर मंगेश साबळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं नेमकं कारणही सांगितलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला का केला? असा प्रश्न विचारला असता मंगेश साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला माजुरडे म्हणतात. मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, असं चितावणीखोर भाष्य करतात. शिवाय मराठ्यांच्या सभांना ते जत्रा म्हणतात, याच कारणातून आम्ही त्यांच्या गाडीवर हल्ला केला, अशी कबुली मंगेश साबळे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- अजित पवारांसमोरच पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “मी त्यांचा सन्मान…”
मंगेश साबळे यावेळी म्हणाले, “मराठे माजुरडे आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, मराठे लाखोंच्या आणि कोट्यवधींच्या संख्येनं सभा घेतायत, ती एक जत्रा आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. ते आमच्या भावनेला ठेच पोहोचवतात. मराठ्यांचा इतिहास तुम्ही विसरलात का? मराठ्यांचं बलिदान तुम्ही विसरलात का? मराठ्यांनी या देशाला आणि स्वराज्याला स्वातंत्र मिळावं म्हणून या मातीला रक्ताने आंघोळ घातली आहे, हे तुम्ही विसरलात का? मराठ्यांना माजुरडे म्हणणं, मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणणं आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, असं म्हणणं हे तरुणांना चेतावणी देणारं आहे. आमच्या भावना दुखावणारं आहे. त्यामुळे याला चाप बसावा म्हणून आम्ही त्यांची गाडी फोडली.”