Pune Session Court Judge Comment: पुण्यातील कुटुंब न्यायालयात पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. यावेळी न्यायाधीशांनी पत्नीवर केलेली टिप्पणी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. घटस्फोटात मध्यस्थी करताना न्यायालयाने पत्नीला उद्देशून म्हटले, “तू मंगळसूत्र घालत नाहीस, टिकली लावत नाहीस, अशाने तुझा नवरा तुझ्यात रस का घेईल?” पुण्यातील वकील अंकुर आर. जहागीरदार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सदर टिप्पणीची पोस्ट केली आहे. संबंधित जोडपे गेल्या काही दिवसांपासून वेगळे वेगळे राहत आहेत. तसेच त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी न्यायालयाने मध्यस्थी केली. न्यायाधीशांच्या या टिप्पणीवर आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
दरम्यान न्यायालयात सुनावणी सुरू असताना पत्नीने आरोप केला की, तिचा पती तिच्यामध्ये अजिबात रस दाखवत नाही. यावेळी न्यायालयाने सांगितले की, पत्नीने एका विवाहित महिलेप्रमाणे राहायला हवे.
वकील जहागीरदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मला व्यक्तिशः ही टिप्पणी बिलकुल आवडली नाही. पण ही टिप्पणी हिमनगाचे एक टोक आहे. जिल्हा न्यायालयात असे अनेक प्रकारची विधाने केली जातात. कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या व्यक्तीला या टिप्पण्या खटकू शकतात. मला वाटते, आपल्या समाजात अवमानास्पद गोष्टी सहन करण्याची सहिष्णूता आहे. पुरुषप्रधान संस्कृतीची हीच मोठी मेख आहे की, तुम्ही याबद्दल बोलू शकत नाही. दुर्दैवाने न्यायाधीशांनी केलेल्या अशाप्रकारच्या टिप्पण्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही.”
न्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी न्यायाधीशांच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध केला आहे. जिल्हास्तरीय न्यायाधीशांनाही आता सॉफ्ट स्किल्स आणि संवेदनशीलतेचे धडे दिले जावेत, अशी मागणी एका युजरने केली आहे.