अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. संबंधित सर्व आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या बंडखोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वास मानले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील अशा नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांनी शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ अचानक का सोडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? याचं उत्तर दिलं आहे. शरद पवारांची साथ सोडण्याचं एकच कारण आहे. त्यांची साथ सोडली याचं १०० टक्के दु:ख मनात आहे, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “आधी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!
शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? याचं नेमकं कारण काय आहे? असं विचारलं असता दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “याचं नेमकं एकच कारण आहे. या गटाच्या (अजित पवार गट) संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. हा सामुदायिक निर्णय आहे. ४० आमदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचं दुसरं काहीही कारण नाही.”
हेही वाचा- “अजित पवारांकडे ३६ आमदार नाहीत, सर्व मंत्री निलंबित होतील”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य
शरद पवारांची साथ सोडल्याचं दु:ख आहे का? असं विचारलं असता दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांची साथ सोडली, याचं मनामध्ये १०० टक्के दु:ख आहे. परंतु कधी-कधी असा निर्णय घ्यावा लागतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत पक्षाची शिस्त कधीही मोडली नाही. त्यामुळे साहजिकच हा निर्णय सामुदायिकपणे घेतला गेला. यामध्ये मला सहभागी व्हावं लागलं.”