मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं समोर आलं असून तिला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
रमेश गुप्ता (६९) हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. तर, त्यांची पत्नी राजकुमारी या गृहिणी असून हे दाम्पत्य त्यांच्या ३० वर्षीय मुलासह मीरा रोड येथे आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. गुरुवारी सायंकाळी गुप्ता यांच्या फ्लॅटमधून आवाज आल्याने सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या शेजऱ्यांनी गुप्ता कुटुंबाकडे धाव घेतली. तेव्हा रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर, त्यांची पत्नी राजकुमारी मृतदेहाशेजारी उभी होती. या प्रकारानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांच्या मुलाला बोलावून घेतले.
हेही वाचा >> मुलीचा संसार विस्कटल्याने वृध्द आईची आत्महत्या; मीरा रोड मधील घटनेने हळहळ
हे प्रकरण समजातच नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी फ्लॅटवर पोहोचले. त्यांनी राजकुमारी गुप्ता यांना अटक केली आहे. तसंच, पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड जप्त केला आहे.
दरम्यान, राजकुमारी आणि रमेश गुप्ता यांच्यात वाद झाले. या वादातून रमेश गुप्ता यांची हत्या केली, अशी कबुली राजकुमारी यांनी दिली आहे. परंतु, त्यांच्यात कोणत्या कारणाने वाद झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तसंच, राजकुमारी नैराश्येत आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. तर, रमेश यांचीही प्रकृती खराब असल्याचं सांगण्यात आलं. राजकुमारी यांना कोणती औषधे लिहून दिली होती, याचा तपास पोलीस घेत आहेत. तसंच, या जोडप्याकडून याआधी कधीही इमारतीतील लोकांना त्रास दिला नव्हता अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
सकाळी कामावर निघण्याआधी आई-वडिलांमध्ये कोणताही वाद झाला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास मी घरी आलो तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मी घरी आल्यावर आईने एकही शब्द उच्चारला नाही, अशी माहिती या दाम्पत्याच्या मुलाने पोलिसांना दिली.
राजकुमारी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.