नगरः पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून नंतर घर पेटवून देऊन, तिघींना जिवंत जाळण्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे आज, सोमवारी सकाळी घडली. पिंपळगाव लांडगा गाव नगर-पाथर्डी रस्त्यावर १५ किमी अंतरावर आहे.
पोलिसांनी या संदर्भात सुनील लांडगे (४५) याला ताब्यात घेतले आहे. या घटनेत त्याची पत्नी लीला (२६), मुलगी साक्षी (१४) व दुसरी मुलगी खुशी (१३ महिने) या तिघींचा जळून मृत्यू झाला. घर पेटवून दिल्यानंतर सुनील लांडगे हा घरासमोरच झाडाच्या सावलीत बसून होता. घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी फौजफाट्यासह धाव घेतली व सुनील लांडगे याला ताब्यात घेतले.
हेही वाचा – शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम
यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सुनील लांडगे याने हे कृत्य सकाळी ९.३० ते १० दरम्यान केले. सुनील लांडगे हा शेती व मजुरी करतो. सकाळी त्याने पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून घेतले. नंतर गावातीलच महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावरून डबा भरून पेट्रोल आणले. खिडकीतून पेट्रोल टाकले व घर पेटवून दिले.
हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल
हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?
धूर निघू लागल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घरातून ओरडण्याचा आवाज येत होता. परंतु तोपर्यंत संपूर्ण घर पेटले होते, त्यात तिघींचा मृत्यू झाला. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.