सांगली : सांगलीकरांना केवळ दर्शन देऊन परत फिरणारा गवा वस्तीलाच राहिल्याने सांगलीकरांची दैना उडाली. उसाचे फड रिकामे होऊ लागताच गेले चार दिवस अंकलखोप, डिग्रज, सांगलीवाडी परिसरात वास्तव्यास असलेला गवा आयर्विन पुलावरून गणेशाचे दर्शन घेऊन बाजार समितीच्या आवारात स्थिरावला. दोन वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आलेल्या गव्याला परतीचा रस्ता लवकर मिळाला. मात्र, या गव्याला सगळीकडे सिमेंटचेच जंगल आढळल्याने भांबावला. अखेर २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोणतीही इजा न होता त्याची अधिवासात मुक्तता करण्यात वनविभागाला यश आले.
तसा कृष्णाकाठ तर महाकाय मगरींचे माहेरच आहे. मगरींचे वास्तव्य सातत्याने सांगलीकरांना दिसते. मगरीचे वास्तव्य नव्याने आहे असेही म्हणता येणार नाही. कारण सांगली शहरात मगरमच्छ कॉलनी अगोदरपासूनच आहे. यामुळे नव्याने मगरींची संख्या वाढली आहे असे म्हणता येणार नाही. मात्र अगदी भिलवडी, आमणापूरपासून म्हैसाळ धरणापर्यंत मगरींच्या वास्तव्याचे दर्शन वेळोवेळी झाले आहे. शिराळा तालुक्यातील वारणा काठही अलिकडच्या काळात मगरींचे नवे आश्रयस्थान झाले आहे. मगरी स्वत: फारसा हेकेखोर असत नाहीत. मात्र, प्रजनन काळात जर धोका दिसला तर मगर आक्रमक होते.
मगरी, बिबटय़ा, गव्याची आश्रयस्थाने बदलत्या काळात बदलत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नदीतील बेसुमार वाळू उपसा हे जसे कारण आहे तसे नद्यांच्या ओतामध्ये झालेली बांधकामे ही सुद्धा कारणे आहेत. गवा, बिबटय़ा हे तर जंगली प्राणी. मात्र, खाद्याच्या शोधात उसाचे मळे त्यांना खुणावत आहेत. उसाच्या आश्रयाने हे प्राणी पश्चिम घाटातील मानवी वस्तीजवळ येऊ लागले आहेत. दिवाळीनंतर साखर कारखान्याचा हंगाम सुरू होताच, दिशाहीन झालेले हे वन्य प्राणी नागरी वस्तीकडे वळू लागले आहेत. उसाच्या फडामध्ये काही बिबटय़ाची पिले सापडण्याचे प्रकारही शिराळा ताफ्क्ययात घडले आहेत. सुदैवाने प्राणिमित्रांचे चांगले जाळे जिल्हाभर पसरले असल्याने ही पिले सुरक्षितपणे मातेच्या कुशीत विसावली. याला वन विभागाचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले.
तथापि, वन्य प्राण्याचे नागरी भागात वाढलेले येणे-जाणे मानवानेही सहजीवन म्हणून मान्य करण्याची वेळ आली आहे. बिबटय़ांचे अस्तित्व आता नागरी वस्तीभोवती केंद्रित झाले आहे. खाद्य म्हणून लागणारे तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाल्याने हे बिबटय़ा सहजसाध्य होत असलेली भटकी कुत्री, लहान पाळीव प्राणी यांना भक्ष्य करीत आहे. माणसावर हा करण्याच्या घटना मात्र फारशा झालेल्या नाहीत. त्यांना त्यांच्या अधिवासातच अन्नाची सुविधा उपलब्ध करून दिली तर त्यांचे मानवी वस्तीकडे खाद्यासाठी येण्याचे प्रमाण घटणार आहे. यासाठी सागरेश्वर परिसरात हरणांचे संगोपन करून त्याची रवानगी तर चांदोली अभयारण्यात केली तर निश्चितच त्याचे चांगले परिणाम पाहण्यास मिळतील.
बाजारपेठेत दहा कोटींचे व्यवहार ठप्प
गव्याने सांगलीत आगमन केल्यानंतर बाजार समिती बंद ठेवावी लागली. यामुळे सुमारे दहा ते पंधरा कोटींचा व्यवहार ठप्प झाला. मात्र, त्याचे अचानक सांगलीत येणे झालेले नाही हेही समजून घ्यायला हवे, चार दिवसांपूर्वी कृष्णाकाठच्या औदुंबरजवळ असलेल्या अंकलखोप गावात गव्याने फेरफटका मारला होता. त्यानंतर शनिवारी रात्री सांगलीवाडी परिसरात आढळला होता. त्या वेळीच वन विभागाने त्याचा माग काढून त्याची रवानगी अधिवासात करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.
मात्र, जसा आला तसा तो परत जाईल अशा विचारात वन विभाग राहिला. वन विभागाला गुंगारा देत त्यांने आयर्विन पुलाची वेस ओलांडून सांगलीकरांना केवळ दर्शनच दिले नाही तर अख्खी बाजारपेठ बंद पाडून मुक्कामही ठोकला. त्याला कोणतीही इजा न होता, तो सुरक्षित अधिवासात परत जाण्यासाठी आवश्यक असलेले बचाव पथकच सांगलीत नाही. माणसं आहेत, मात्र आधुनिक साधनांचा अभाव तीव्रतेने जाणवत आहे.
कुंडल येथे वन अकादमीची स्थापना झाली. इथे तयार होणारे प्रशिक्षित वन कर्मचारी देशभर जाऊ लागले. मात्र, या अकादमीत वन्य प्राण्यांचा बचाव करणारे पथक असू नये याचे आश्चर्य वाटते.
मगर, बिबटय़ा या वन्य प्राण्यांच्या जोडीने आता आपणास गव्याबरोबर सहअस्तित्व स्वीकारावे लागणार आहे. या वन्य प्राण्यांचे माणूस हे खाद्य नसल्याने धोका नसला तरी जागरूकताही महत्त्वाची आहे. विशेषत: रान वस्तीवर वास्तव्य असलेल्यांनी साधवगिरी बाळगली तर धोका वाटणार नाही. रानातून एकटे जात असताना आवाज करीत जाणे, विजेरीचा वापर करणे ही खबरदारी घेतली तरी धोका टाळता येऊ शकेल.
– अजितकुमार पाटील, मानद वन्य जीवरक्षक, सांगली.
बाजार समिती परिसरात गव्याला पकडण्यात आले.