वनखात्याच्या जंगलात वन्यप्राण्यांना खाण्यासाठी काहीच नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत येत असल्याची जनतेची ओरड वनखात्याच्या कानावर पडल्याने यंदा वनखात्याच्या जंगलातील काजू, कोकम, आंबा अशा वन उत्पादनाचे लिलाव रोखण्यात आले. दरवर्षी होणारे हे फळांचे लिलाव वन्यप्राण्यासाठी स्थगित ठेवण्यात आले, पण दुसरीकडे वणवे वनखाते रोखू शकले नसल्याने वन्यप्राण्यांच्या तोंडचा घासच नष्ट झाला आहे असे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वनखात्याचे जंगल आहे. सर्वाधिक क्षेत्र सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात आहे. वनखाते जंगलाचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरले असून, वृक्षतोड होऊनही कारवाईत कुचराई केलेली आहे. जंगलाची पाहणी करणारी टीम जंगलातच जात नसल्याने वनकर्मचारी वृक्षतोड दुर्लक्षीत करत आहेत असे बोलले जाते.
जिल्ह्य़ात खाजगी व वन जंगल आहे. खाजगी जंगल वनसदृश स्थिती असल्याने तेथे वनसंज्ञा शासनाने लावली आहे, पण वनसंज्ञा जमिनीतील बेसुमार वृक्षतोडीशी वनखाते संबंध नसल्यागत पास देत आहेत. वनसंज्ञेतील वृक्षतोड खाजगी सव्र्हे नंबरशी दाखवून हा वृक्षतोडीचा व्यवहार झूट पण कागदोपत्री सत्य करून दाखविला जात आहे. त्यासाठी एक दरपत्रकही असल्याचे सांगण्यात येते.
जंगलातील प्राणी लोकांच्या कृषी लागवड केलेल्या क्षेत्रात येऊन नुकसानी करत असतात. वनजंगलात या प्राण्यासाठी अन्न, पाणी नसल्याने वन्य पशु-पक्षी लोकवस्तीत येत असल्याची ओरड होती. त्यामुळे यंदा वनजंगलातील फळ लिलाव करण्यात आला नाही. वन्यप्राण्यासाठी लिलावाला स्थगिती देण्यात आली.
वनजंगलात आंबा, काजू, कोकम, आवळा अशा विविध उत्पादनाचा दरवर्षी लिलाव घातला जातो. हा लिलाव सेटिंग करून घेतला जातो. त्यानंतर त्यातील उत्पादन हंगामापुरते घेतले जाते.
यंदा जिल्ह्य़ातील सर्वच जंगलातील लिलाव स्थगित ठेवण्यात आला. वन्यप्राण्यासाठी खाद्य म्हणून लिलावाला स्थगिती दिली गेली असे सांगण्यात आले.
उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्य़ातील वन खात्याच्या मालकीच्या जंगलातील लिलाव व्हायचा, पण यंदा वन्य पशु-पक्ष्यांसाठी खाद्य मिळावे म्हणून हा लिलाव स्थगित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वनखात्याने जंगलातील लिलाव प्रक्रिया स्थगित ठेवली असली तरी बहुतेक वन जंगलाना वणवे लागल्याने वन उत्पादने त्यात भस्मसात झाली. तसेच वन्य पशु-पक्ष्यांची निवासस्थानेही नष्ट झाली. वन्यप्राणी वणव्यानी सैरावैरा पळाले. त्याचे संरक्षण मात्र वनखाते करू शकले नाही असे पर्यावरणप्रेमीत बोलले जात आहे.
वनजंगलात प्राण्यासाठी अन्न व पाणी मिळाले तर वन्य पशु-पक्षी लोकवस्तीत येण्याचा संभव नाही, पण त्या दूरदृष्टीचा अभाव असल्याने वनखाते उपक्रम राबवू शकले नाही. बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांना पास देण्याची सोय मात्र तात्काळ आहे. वृक्षतोड करणाऱ्यांनी झाडे लावली किंवा नाही, हे वनखात्याने नजरपाहणी करण्याची किमया केल्याचे ऐकिवात नाही.
जंगलातील फळांचा लिलाव वनखात्याने ठेवून वन्य प्राण्यावर दया केली, पण वणवे आणि वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याने ती एक समस्या बनली आहे.
वन्यप्राण्यांसाठी वनातील लिलाव रोखला
जंगलातील प्राणी लोकांच्या कृषी लागवड केलेल्या क्षेत्रात येऊन नुकसानी करत असतात.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 19-05-2016 at 01:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild animals forest department