सांगलीच्या सीमेवर फिरत असलेला गवा मध्यरात्री शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास बाजार समिती गाठली. वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दी होऊ नये आणि गव्याला पकडण्यात अडचणी येऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गवा घुसल्याने आज बाजार समिती बंद ठेवली आहे. या एका दिवसात १० कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग, महसूल प्रशासन, बाजार समिती प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या गव्याला एका ठिकाणी थांबवण्यात आलंय. मात्र, त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. हा गवा गेल्या चार दिवसांपासून या परिसरात फिरतोय. पुणे आणि कोल्हापूरवरून तज्ज्ञांचं पथक या गव्याला पकडण्यासाठी बोलावण्यात आलंय, अशी माहिती विभागीय वनअधिकारी अजित साजने यांनी दिली.

१० कोटींची उलाढाल थांबणार..

शहरात कलम १४४ लावल्यामुळे आज बाजार समितीतील हळदी आणि गुळाचे सौदे आणि धान्याची खरेदी-विक्रीची उलाढाल होणार नाही. त्यामुळे आज दिवसभरात जवळपास १० कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत न येऊन गर्दी टाळण्यास मदत करावी, असं आवाहन बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी केलं.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild bull gava entered in sangali market yard hrc