राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी मंत्रीपदाबाबत आपण सकारात्मक असल्याचे म्हटले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कोट्यातले एक मंत्रीपद अजित पवार यांच्या पत्नीला मिळणार का? अशी चर्चा सुरू आहे.
सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात यावे, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. अशी संधी मिळाली तर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले की, “माझ्या पक्षाचे हे मोठेपण आहे. त्यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत. मला जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचे सोने करण्यासाठी मी प्रयत्न करेन.”
बारामतीमधील पराभवाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत होता. पण जनतेचा कौल आता स्वीकारावा लागेल. पराभव का झाला, याचे विश्लेषण आम्ही करत आहोत. त्यातून आत्मपरिक्षण नक्कीच केले जाईल. काय घडले, याचा शोध घेऊन पुढील निवडणुकीत त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू.
बारामतीमध्ये नवीन दादा होणार का?
बारामतीमध्ये केंद्रात ताई आणि राज्यात दादा, असे सूत्र पाहायला मिळत होते. मात्र आता बारामतीत विधानसभेला नवे दादा उभा राहू पाहत आहेत. त्याबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की, राजकारणात प्रत्येकाला काही ना काही इच्छा असतात. अशा इच्छा कुणी व्यक्त केल्या असतील तर त्याला माझी काही हरकत नाही. लोकशाहीत प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात.
तसेच गुंड गजा मारणेची खासदार निलेश लंकेंनी भेट घेतल्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. “काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. तेव्हा रान उठवले गेले. सर्वांना ही व्यक्ती कोण आहे, ते चांगले माहिती आहे. पुन्हा अशा घटना घडत आहेत, त्यामुळे यावर विचार केला गेला पाहीजे.