राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. तसंच, इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढत या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अनेक नवे उमेदवारही आपलं नशिब आजमावून पाहणार आहेत. ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकेही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांनी आज स्पष्ट मत मांडलं आहे. मुंबईतील इंडिया टुडे कॉनक्लेव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.
आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सुरुवातील मिश्किल उत्तर दिलं. त्यावर त्यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देण्याची विनंती मुलाखतकाराने केली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “पक्ष मला जी जबाबदारी देईल ती निवडणूक मी लढवेन. पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल.”
हेही वाचा >> “पेंग्विनमुळे ५० कोटींचा नफा, पण चित्त्यांचं काय झालं?” आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, “५० खोके घेऊन…”
एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत माहित होतं का?
“बंडखोरीच्या महिनाभर आधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का हे विचारलं होतं. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून विविध माध्यमातून ही माहिती समोर येत होती की ते पक्षात बंडखोरी करण्याच्या वाटेवर आहेत. तसंच, उद्धव ठाकरे आता रुग्णालयात आहेत, ते पक्ष चालवू शकतात का? असा प्रचारही त्यांनी केला. एखाद्या माणसांचं मन किती काळं असू शकतो. ज्या माणसाने आपल्याला घडवलं, जेव्हा तो रुग्णालयात असतो त्याचा फायदा घेऊन हे स्वतःचं करिअर बनवतात. ज्यावेळी त्यांना (बंडखोरीबाबत) विचारलं तेव्हा ते रडू लागले आणि म्हणाले ते (भाजपा) तुरुंगात टाकतील. तुरुंगात जाण्याचं हे वय नाही, मुलालाही तुरुंगात टाकतील. असं बोलून ते पळून गेले (बंडखोरी केली). ते पळाले कारण ते घाबरले. जे धीट होते, प्रामाणिक होते ते पक्षासोबत राहिले.”
आम्ही आणलेल्या पेग्विंनमुळे ५० कोटींचं उत्पन्न
आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन संबोधून त्यांची खिल्ली उडवली जाते. याबाबत त्यांना आज विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले की, “सहा वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत पेग्विंन घेऊन आलो. कोणत्याही प्राण्याची जगभरातून आयात करायची असते तेव्हा मोठा पत्रव्यवहार वगैरे करावा लागतो. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांना भारतात आणलं होतं. आज पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालय नफ्यात आलं आहे. दरदिवशी ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा. आमच्या पेंग्विनने मुंबई पालिकेला ५० खोक्यांचं उत्पन्न मिळवून दिलं. पण जे पळून गेले ते स्वतःसाठी ५० खोके घेऊन पळाले.”