Ajit Pawar and Sharad Pawar Meeting : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यास सहमती दर्शवल्यानंतर आता पवार काका-पुतणेही एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत या काक-पुतण्यांची दोनवेळा भेट झालीय. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालय येथे कृषी क्षेत्रात AI वापराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला पार पडली. या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. पण या भेटीमुळे नवे तर्कवितर्क लावले जात असताना या भेटीबाबत अजित पवारांनी थेट उत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गेल्या १५ दिवसांत दोनवेळा शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “परिवारातील कार्यक्रमासाठी परिवार म्हणून आपण एकत्र येत असतो. ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षं चालत आलेली संस्कृती अन् परंपरा आहे. यात बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही. हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे.”

जनतेच्या हितासाठी अशा बैठका घेतल्या पाहिजेत

ते पुढे म्हणाले, “शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यात मीही सदस्य म्हणून काम करतो. आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेमार्फत साडेचार लाख गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं. तिथेही एआयचा काय वापर करू शकतो. या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण कशा पद्धतीने देऊ शकतो, त्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, याबद्दल आम्ही शासनामध्ये काम करतो. त्यामुळे ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, पाण्याची-खताची बचत होणार असेल तर हे केलं (अशा बैठका घेतल्या पाहिजेत) पाहिजे. या गोष्टी तर कुठेच अडचणीच्या नाहीत. पंतप्रधानही इतर मान्यवरांना बोलावतात आणि चर्चा करतात. काही विषय असे असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायच्या असतात. सर्वच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं.”

“काही जणांकडे अधिकची माहिती असते, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण करणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीला येत्या १ मे रोजी ६५ वर्षे पूर्ण होतील. या ६५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला हेच शिकवलं आहे. त्यामुळे मी अशा बैठकांना जात असतो”, असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलंय.