पंढरपूर : सत्तांतर होताना अनेकांनी टीका केली, आरोप केले. अशा विरोधकांना कामातून उत्तर देणार. राज्य सुजलाम् सुफलाम् करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच सभागृहात थोडेच सांगितले, अजून खूप बाकी आहे असे सूचक वक्तव्य शिंदे यांनी केले. ते पंढरपूरमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचाय हद्दीतील महेश साठे यांच्या निवासस्थानी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी शिंदे यांनी ठाकरे सरकारमध्ये असताना आलेल्या अडचणी, बाहेर पडल्यानंतर भूमिका आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या विकासाबाबत भाष्य केले.  शिंदे म्हणाले की, ही लढाई सोपी नव्हती. सरकारमध्ये अनेक आमदारांचे खच्चीकरण होत होते. मतदारसंघांत कामे होत नव्हती अशा अनेक कारणांनी अनेक आमदार नाराज होते. त्यानंतर सत्तांतर झाले. मात्र आम्ही  विचारांची लढाई लढलो. यामध्ये ५० आमदारांनी विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांची शिकवण पुढे नेणार आहे. आमच्याविरोधात खूप काही टीका झाली, पण या टीकेला कामातून उत्तर देणार.

पंढरपूरला आलो, महापूजा केली. हजारो भाविक रस्त्यावर उभे राहून  हात वर करत होते. मला पोलीस गाडीत बसा म्हणाले. मी म्हणालो, वारकरी अन्यायविरोधात वार करतो, त्याच्याकडून धोका नाही. ज्यांच्याकडून होता तो टळला आहे, असे शिंदे म्हणाले.

ही सत्ता शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. आता जनतेचा सेवक, एक कार्यकर्ता म्हणून मी काम करीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंढरपूर शहराचा, मंदिराचा विकास करून चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

  • धोका टळला.. वारकरी अन्यायविरोधात वार करतो. त्यांच्याकडून धोका नाही. 

ज्यांच्याकडून होता तो टळला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Story img Loader