चिपळूण : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा त्यांचे पुत्र विक्रांत जाधव याला सोडून ते चिपळूण मधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. पक्षाचे निरीक्षण आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकतेच कोकणचा दौरा केला. यावेळी आमदार जाधव यांची आमदार नार्वेकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार भास्कर जाधव सध्या गुहागरचे आमदार आहेत. या मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना सत्तावीस हजाराचे मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे गुहागर मध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची ताकद मजबूत आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचा चिपळूणमध्ये पराभव झाला होता. चिपळूण मधून ते सलग दोन वेळा विजय झाले होते. तिसऱ्या वेळी त्यांचा पराभव झाला. भास्कर जाधव यांना तो पराभवाचा डाग पुसायचा आहे. तसेच मुलगा विक्रांत याला आमदार बनवायचे आहे.

आणखी वाचा-तिलारी कालव्याला भगदाड; गोव्याचा पाणी पुरवठा बंद राहणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर राज्यात निर्माण झालेली परिस्थिती भास्कर जाधव यांना चिपळूण मधून पुन्हा जिंकण्यासाठी तसेच गुहागर मधून मुलगा विक्रांत याला आमदार बनवण्यासाठी अनुकूल वाटत आहे. त्यामुळे गुहागरची जागा ते मुलासाठी सोडणार असून ते चिपळूण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या संदर्भात भास्कर जाधव यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. मात्र रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकतेच कोकणचा दौरा केला. त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरच्या आणि चिपळूणच्या जागे संदर्भात नार्वेकर यांच्याशी खाजगीत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will bhaskar jadhav change constituency for son vikrant jadhav mrj