राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करावा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? याबाबतही स्पष्ट विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात.”

हेही वाचा- “सुजित पाटकर पळून जाणार” कोविड केंद्रातील घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचं मोठं विधान

“त्यामुळे स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपाचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नाही” असं स्पष्ट विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

हेही वाचा- नाशिक : महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर, खडसेंच्या भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

यावेळी त्यांनी भाजपा आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते का? यावरही भाष्य केलं आहे. या राज्यात भविष्यात काहीही होऊ शकतं. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, असं कुणालाही अपेक्षित नव्हतं, पण ते झालं. तसेच अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस पहाटे शपथ घेतील, असंही वाटलं नव्हतं, पण ते घडलं. आता एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील आणि देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण तेही घडलं. राज्यात अलीकडच्या काळात ज्या अनाकलनीय घटना घडत आहेत, त्यामुळे जनतेचा विश्वासही डळमळीत व्हायला लागला आहे. अशा स्थितीत मनसे आणि भाजपा एकत्र आले तर आश्चर्य वाटून घ्यायचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will bjp leader pankaja munde join ncp eknath khadse statement in nashik rmm