सोलापूर : राज्यात कांद्यासाठी लौकिक मिळविलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी न उतरण्याची भूमिका घेतली असताना दुसरीकडे त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे आमदार सुभाष देशमुख हे मात्र आपले पॅनेल उभे करण्यावर ठाम आहेत. आपल्या सोबत कोणी आल्यास त्यांच्यासोबत आणि कोणी न आल्यास त्यांना सोडून निवडणूक लढविण्याचा पवित्रा जाहीर केला आहे.
या निवडणुकीत १८ जागांसाठी एकूण ४३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, या अर्जांपैकी समितीचे माजी सभापती, माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून, त्यावर निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय उद्या बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे.
भाजपचे आमदार, माजी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका प्रथमच जाहीर केली आहे. मागील २०१७ सालच्या निवडणुकीत सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे दोघेही मंत्रिपदावर असताना एकमेकांच्या विरोधात लढले होते. यात सुभाष देशमुख यांचे पॅनेल पराभूत झाले होते.
यंदा मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बाजार समिती कोणाच्या ताब्यात द्यायची आणि कोणाला बाजार समितीपासून दूर ठेवायचे, याची निर्णायक भूमिका त्यांच्याकडे राहणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. ही निवडणूक ताकदीने वाढविली जाणार असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घडामोडींतून बाजार समितीची निवडणूक भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांमध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांनी महाविकास आघाडीचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदींना सोबत पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात आले. त्या दृष्टीने त्यांची खूप यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे याच पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दोघे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते.