भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभा घेतली. या सभेला हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. वर सूर्य आग ओकत असतानाही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आणि जनता भर उन्हात भाषण ऐकत होते. त्यांना उद्देशून पंकजा मुंडे यांनीही तुफान भाषण केलं. तसंच, त्यांच्या विरोधकांनाही सज्जड दम दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात मी पडले. राजकारणात पडल्यावर कुबड्या घेऊन चालावं लागेल. या कुबड्या पक्ष देऊ शकते किंवा जनता देऊ शकते. मला जनतेने एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यांत मॅरेथॉनमध्ये पळण्याची हिंमत माझ्यात आली.

दरम्यान, पंकजा मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या सातत्याने चर्चा होत असतात. या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देऊन देऊनही तुम्हाला निष्ठा मिळवता आली नाही. पदं न देताही निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात आले. दहा वेळा यांचं स्वप्न तुटलं. पण पुन्हा यांच्या डोळ्यांत स्वप्न जन्म घेत आहे. (निवडणुकीत) पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू महेशही आपल्या युद्धात हरले होते. श्रीदेवांनाही युद्धाचं संकट आहे. देवीलाही आसुरांविरोधात युद्ध करावं लागतं. मग युद्धाला आपण का तयार राहणार नाही? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला.

हेही वाचा >> “न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला..”, पंकजा मुंडे यांचं सावरगावातू जोरदार भाषण

पंकजा मुंडे यांचं हे भाषण भर उन्हात झालं. डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही हजारोंचा जनसमुदाय मुंडे भगिनींचं भाषण ऐकायला उपस्थित होता. त्यांच्यासाठी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “तुम्हाला द्यायला साधी सतरंजीसुद्धा नाही माझ्याकडे. तुम्हाला मला खायला घालता येत नाहीय. तुम्ही उन्हात बसला म्हणून स्टेजवरच्यांनाही उन्हात ठेवलं आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्याच्या डोक्यावर सावली ठेवणाऱ्याचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला दूर ठेवू शकत नाही. ज्याला ज्याला पदे दिली ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. पण ही जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाणार नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. आता आपल्याला ऊन लागणार नाही. आता आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर आम्ही उन्हात बांधू. आता माझी माणसं उन्हात राहणार नाहीत. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझी माणसं भगवान शिवाचं रूप आहेत. शिवशंकर खूप भोळा आहे. पण त्यालासुद्धा तिसरा डोळा आहे.”

“न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है.. असा शेरही आज पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. माझ्या आयुष्यात मी एखादी निवडणूक मी हरले असेन तरीही तुमच्या (जनतेच्या) नजरेतून मी पडलेले नाही. इथे आलेला एखाद्या जातीचा माणूस नाही. गोपीनाथ मुंडे म्हणायचे तसं माझ्या कातड्याचे जोडे करुन घातले तरीही तुमचं हे प्रेम, आपुलकी आणि ऋण मी फेडू शकत नाही. शेती करणारे लोक आज आनंदात आहेत का? त्यावर उपस्थितांनी नाही असं उत्तर दिलं. माझ्या भाषणात शेतमजूरही करणारे लोक आलेत त्यांनाही मजुरी मिळत नाही. ही आज परिस्थिती आहे. उस तोड कामगार आहेत, त्यांना पैसे वाढवून मिळणार नाहीत तोपर्यंत ते उस तोडायला जाणार नाही. सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईपर्यंत मी शांत बसणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will build the house in sun of those who trouble us pankaja mundes target from bhagwan gad sgk