गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला फरफटत भारतात आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने पूर्ण करू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
जिल्ह्य़ातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री असताना मुंडे यांनी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला फरफटत भारतात आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा बदलत असून संयुक्त राष्ट्रसंघात पूर्वी भारताचे पंतप्रधान पाकिस्तानविरुद्ध जाऊन तक्रार करीत. आता पाकिस्तान भारताविरुद्ध तक्रार करीत आहे. त्यामुळे मुंडे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मोदी यांच्या मदतीने पूर्ण करून दाऊदला भारतात आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ग्रामीण विकास संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शंभर एकर जमीन देण्यात आली.