Shahajiraje Bhosale Samadhi in Karnatak : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची कर्नाटक येथे समाधी आहे. या समाधीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचं दुर्लक्ष झाल्याची माहिती कांदबरीकार विश्वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उजेडात आणली होती. आता हाच प्रश्न आज विधान परिषदेत विचारण्यात आला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाधीची डागडुजी करण्याचे आश्वासित केले आहे.

कर्नाटकातील शिमोगा शहरापासून एक तासाच्या अतंरावर असलेल्या होजिगिरी नावाच्या खेड्यात (जिल्हा दावणगिरी) येथे शहाजीराजेंची समाधी आहे. २३ जानेवारी १६६४ साली याच परिसरात घोड्यावरून पडून शहाजीराजांचा अपघाती मृत्यू झाला होता. इथेच एकवीस गुंठे जागेवर गावाबाहेरच्या माळावर शहाजीराजेंची समाधी आहे. या समाधीवर साधं छप्परही नसल्याची तक्रार कांदबरीकार विश्वास पाटील यांनी केली होती. हाच प्रश्न आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शिवाजीराव गरजे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.

“कर्नाटक राज्यात शहाजीराजांची समाधी आहे. त्या ठिकाणी आपल्याला यथोचित स्मारक करावं अशी विनंती आहे”, असं शिवाजीराव गरजे म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं. ते म्हणाले, “शहाजीराजांच्या समाधीबद्दल अनेक बातम्या आल्या आहेत. समाधीची परिस्थिती चांगली नाही, हेही समोर आलं आहे. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारला विनंती करून समाधीची डागडुजी करण्याची विनंती करणार आहोत, अन्यथा डागडुजी करायला आम्हाला परवानगी द्या, अशी विनंती करणार आहोत.”

विश्वास पाटलांनी समाधीच्या दूरवस्थेबाबत काय म्हटलं होतं?

शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि “महाराष्ट्र “या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत (कशाबशा २० गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दूरवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल! गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती. जेव्हा १६२४ साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा इब्राहिम आदिलशहा यांची फौज इथे चालून आली होती, तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच गनिमी कावा नावाच्या युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता. त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या फौजेचा धुव्वा उडवला होता”, अशी माहिती विश्वास पाटलांनी दिली होती.

Story img Loader