कायदा मोडल्यास आमच्या पक्षातील किंवा मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास राज्य सरकार कचरणार नाही, असे परखड स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. त्याचबरोबर पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांना पुन्हा मुंबईमध्ये कार्यक्रम घ्यायचा असेल, तर राज्य सरकार त्यांना सर्वोतोपरी सुरक्षा पुरवेल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
‘इंडिया टुडे’ने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका परिसंवादात बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात केवळ कायद्याचेच राज्य चालेल, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आलेल्या गुलाम अलींच्या कार्यक्रमाला कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्याची सरकारची तयारी होती. पण यासंदर्भात औपचारिकपणे त्यांना कळविण्या अगोदरच आयोजकांनी मुंबईतील कार्यक्रमच रद्द केला. मात्र, यापुढे गुलाम अलींना मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम घ्यायचा असेल. तर सरकार त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवेल. कायदा जर कोणी हातात घेणार असेल, तर मग तो आमच्या पक्षातील असो किंवा आमच्या मित्र पक्षातील त्याला अटक करायला सरकार अजिबात मागे-पुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांना राज्य सरकारने दिलेल्या सुरक्षेबाबतही त्यांनी भूमिका मांडली. कसुरी यांना सुरक्षा दिली, याचा अर्थ त्यांच्या मतांचे आम्ही समर्थन करतो, असा होत नाही. तीव्र विरोध झाल्यानंतरही केवळ राजधर्माचे पालन करायचे म्हणूनच सरकारने त्यांना सुरक्षा पुरविल्याचा खुलासा त्यांनी केला.

Story img Loader