हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसकडून तीन वेळा नेतृत्व केलेले माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे. त्यांनी रविवारी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात प्रवेश करावा, असे मत व्यक्त करताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय समोर ठेवला.
माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांना नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न देता हिंगोलीची जागाच शिवसेना ठाकरे गटाला सोडली होती. त्यामुळे नाराज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाऊ पाटील गोरेगावकर यांना अपक्ष निवडणूक मैदानात उतरण्याचा आग्रह केला. ते निवडणूक मैदानात उतरले मात्र त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसने निवडणूकीदरम्यान बंडखोरी करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढले होते. मात्र अपक्ष निवडणूक लढवल्यानंतरही काँग्रेस पक्षाने भाऊ पाटील गोरेगावकर यांना पक्षातून काढले नव्हते. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारीचे काय ? असा सवाल उपस्थित करून काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्तेच गोरेगावकर यांच्याकडे आग्रह धरत होते. अखेर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी रविवारी प्रमुख समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, विद्यमान व माजी सरपंच, काँग्रेसचे सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, जि. प. चे माजी शिक्षण सभापती संजय उर्फ भैय्या देशमुख, माजी सदस्य कांतराव हराळ, द्वारकादास सारडा, तसेच शेख नईम शेखलाल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत भाऊ पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षासाठी आपण काय केले व पक्षाने त्याची दखल न घेता कशा पद्धतीने जिल्हा स्तरावरील विविध कार्यक्रमात निर्णय घेताना डावलले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समर्थक कार्यकर्त्यांवर झालेले अन्याय, याचा पाढाच गोरेगावकर यांनी वाचला. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून मला राहवत नाही म्हणून बैठकीचे आयोजन केले होते. कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील त्या प्रमाणे शिवसेना शिंदेगट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पैकी कोणत्या पक्षात प्रवेश करावयचा हे कार्यकर्त्यांनीच ठरवावे. आपणच कार्यकर्त्यांसोबत आहोत, असेही ते म्हणाले. त्यावर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करावा असे मत मांडले. कार्यकर्त्यांचा कल, बैठकीतील एकूण चर्चा लक्षात घेता भाऊ पाटील गोरेगावकर लवकरच आपल्या सर्व समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.